ठाणे- कोरोनाशी लढा देण्यासाठी ठाण्यातही येत्या तीन आठवड्यांत १००० बेडचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी याबाबतचे आदेश ठाणे महापालिकेला दिले. ठाणे महापालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हबचे रुपांतर या तात्पुरत्या रुग्णालयात करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे.
ठाणे महापालिका हद्दीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा शिंदे यांनी सोमवारी ठाणे महापालिकेतील बैठकीत घेतला. यावेळी महापौर नरेश म्हस्के, आयुक्त विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर, आरोग्य अधिकारी डॉ. माळगावकर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. केंद्राच्या पथकाने काही दिवसांपूर्वी ठाण्यात भेट देऊन कोरोना प्रतिबंधासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांची पाहणी केली होती. या पथकाने रुग्णसंख्या वाढण्याबाबत व्यक्त केलेल्या अंदाजाची दखल घेऊन त्यानुसार उपाययोजनांची व्याप्ती वाढवण्याचे निर्देश शिंदे यांनी सोमवारच्या बैठकीत दिले.