ठाणे : भारतीय सैन्यातील जवान सुनील नागनाथ शिंदे यांना लेहमध्ये बचाव कार्यादरम्यान वीरमरण आले. शिंदे हे मूळचे बदलापूरचे आहेत. ते जानेवारी महिन्यात लेहमध्ये बेपत्ता झाले होते. बचाव कार्यादरम्यान त्यांना वीरमरण आले असल्याची माहिती आहे.
बदलापूरचे सुनील शिंदे यांना वीरमरण
हेही वाचा -गृह अलगीकरणातील रुग्णांच्या आता दोन्ही हातावर लागणार शिक्के
बचावकार्यादरम्यान वीरमरण
३६ वर्षीय सुनील शिंदे हे भारतीय सैन्यात अभियांत्रिकी विभागात कार्यरत होते. सध्या त्यांची पोस्टिंग लेह भागात झाली होती. जानेवारी महिन्यात या भागात जोरदार हिमस्खलन झाले. यावेळी बचावकार्यासाठी भारतीय सैन्याची मदत घेण्यात आली. यावेळी सेवेत असताना, अचानक सुनील शिंदे व इतर काही सैनिक बेपत्ता झाले. परंतु हिमस्खलनामुळे या सैनिकांचा शोध घेणे कठीण झाले होते. मार्च अखेर या ठिकाणी बर्फ वितळण्यास सुरुवात झाल्यानंतर बर्फाखाली गाडले गेलेल्या सुनील शिंदे व इतर सैनिकांचे मृतदेह हाती लागले. तात्काळ या घटनेची माहिती सैनिकांच्या घरी देण्यात आली. यावेळी बदलापूर (पूर्व) शिरगाव परिसरात वास्तव्यास असलेल्या सुनील शिंदे यांच्या वीरमरणाची बातमी कळताच, शिंदे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
हेही वाचा -ठाण्यात मिनी लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंता
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ..
शहीद जवान सुनील शिंदे यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटून मध्यरात्रीच्या सुमारास उशिरा बदलापूर येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. सुनील शिंदे यांच्या पार्थिवाला भारतीय सैन्याकडून अखेरची सलामी देत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनील शिंदे यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, 1 मुलगा व 1 मुलगी असा परिवार आहे. सुनील शिंदे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेल्या प्रत्येकाने त्यांच्या शौर्याला अखेरचा सलाम केला. अशा या वीर जवानाला जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थेच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली आहे.