ठाणे- नोटाबंदीनंतर पुन्हा एकदा नियोजन न करताच पंतप्रधान मोदींनी लॉकडाउनचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याची टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केंद्र सरकारवर केली आहे. मेधा पाटकर ह्या पायपीट करत गावी जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांची व्यथा जाणून घेण्यासाठी भिवंडीत आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मोदी सरकार लॉकडाउनच्या काळात थाळी, टाळी वाजविण्याचा तसेच दिवे लावण्याच्या निर्णयावरही त्यांनी सडकून टीका केली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित केला होता. मात्र दुसऱ्यांदा घोषित केलेल्या लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ येऊन ठेपल्याने हजारो परप्रांतीय मजुरांची पायपीट गेल्या दीड महिन्यापासून सुरुच आहे. मात्र केंद्र सरकार अद्यापही या मजुरांना सुविधा देत नसून गेल्या काही दिवसापासून या मजुरांना मूळ गावी सोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही केंद्र सरकारकडे या मजुरांसाठी रेल्वे सुरू करण्याची मागणी करत होते. मात्र, सुरवातीला त्यांच्या मागणीकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप मेधा पाटकर यांनी केला आहे. आजही ज्याप्रमाणे या कामगारांना गावी जाण्यासाठी रेल्वेची सुविधा पुरवली पाहिजे होती, त्या मानाने अपुरीच आहे. त्यामुळे आजही हजारो मजूर पायीच आपल्या मूळ गावी जात असल्याचे दिसून येत असल्याचे मेधा पाटकर यांनी सांगितले.