महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बिहारच्या 'चमकी' तापाचा कल्याणमध्ये शिरकाव? मेंदूज्वरने बालकाचा मृत्यू

श्लोकचा मृत्यू मेंदूज्वरने झाल्याची प्राथमिक माहिती मिळताच त्याचे वैद्यकीय नमुने घेतले. ते अंतिम तपासणीकरिता पुण्याच्या वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठवले जातील. तसेच, अहवाल आल्यानंतरच श्लोकचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होऊ शकणार असल्याची माहिती पालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

श्लोक

By

Published : Jul 26, 2019, 5:19 PM IST

ठाणे- बिहारमध्ये 'चमकी बुखार' अर्थात तापाने अनेक मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच कल्याणमध्येही चमकी तापाने शिरकाव केल्याची घटना समोर आली आहे. श्लोक कृष्णा मल्ला (वय 7) या लहान मुलाचा ताप आल्यानेच मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा चमकी ताप तर नाही ना, याचा तपास प्रशासनाकडून सुरू आहे.

कल्याण पश्चिम परिसरातील वाडेघरमध्ये मृत श्लोक आईवडिलांसह राहत होता. त्याचे वडील ठाण्यातील एका खासगी कंपनीत कामाला आहेत. त्यांचा मुलगा श्लोक हा कोनगावच्या इंग्रजी शाळेत शिकत होता, 22 जुलैला त्याला ताप आल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी तपासून औषध दिले. मात्र, त्याचा ताप कमी होत नसल्याने त्याला 23 जुलैला पुन्हा रुग्णालयात आणले, त्यावेळी त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या केल्या. त्यानंतर 24 जुलैला श्लोकची प्रकृती आणखी बिघडल्याने त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, त्यावेळी मेंदूमध्ये ताप गेल्याने त्याला उलटी झाली. येथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

खळबळजनक बाब म्हणजे, चमकी तापासारखीच लक्षणे त्याच्यामध्ये दिसून आली होती. त्याला (एएनईसी) अक्युट नेक्रोटाईझिंग ईन्सफाल्टस या मेंदूज्वराने मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद केले आहे. मात्र, रुग्णालय व्यवस्थापनाने या प्रकरणी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे, तर याच रुग्णालयात अशाच प्रकारच्या मेंदूज्वराने बाधित झालेल्या चार वर्षाच्या तनुजा सर्वांना तिच्या पालकांनी उपचारासाठी आणले होते. ती व्हेंटिलेटरवर होती. वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी तिचाही मृत्यू झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.

यासंदर्भात कल्याण डोंबिवली महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.राजू लवंगारे यांनी माहिती दिली की, श्लोकचा मृत्यू मेंदूज्वरने झाल्याची प्राथमिक माहिती मिळताच त्याचे वैद्यकीय नमुने घेतले, ते अंतिम तपासणीकरिता पुण्याच्या वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठवले जातील. तसेच, अहवाल आल्यानंतरच श्लोकचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होऊ शकणार आहे, तर श्लोक राहत असलेल्या परिसराचे संरक्षण केले जाईल. त्या ठिकाणी तापाचे रुग्ण किती आहेत, या आजाराची लागण कोणाला झाली आहे का, याची माहिती घेऊन उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details