ठाणे - चिरंजीवी संघटनेच्या अध्यक्षा अवघ्या सोळा वर्षाच्या सलोनी तोडकरी यांनी बालभिकारी मुक्त भारत करण्याकरता उपोषण सुरू केले आहे. साने गुरुजी जयंतीनिमित्त भारताच्या भविष्याकरता सुरू करण्यात आलेल्या या उपोषणाची राज्य कार्यवाह वैष्णवी ताम्हणकर यांनी साने गुरुजींच्या गोष्टींचे अभिवाचन करून सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे सलोनी ही मंगळवारपासून सलग तीन दिवस विविध गावांमध्ये जाऊन उपोषण करणार आहे. मंगळवारी भिवंडी तालुक्यातील बापगावमध्ये असणाऱ्या मैत्रकूल संस्थेच्या आवारात सलोनी उपोषणाला बसली आहे.
हेही वाचा -खेळण्याच्या बहाण्याने नेवून ९० हजारात विक्री केलेले बाळ पुन्हा आईच्या कुशीत
आज देशात भिक मागण्यासाठी मोठ्या प्रमाणात लहान मुलांचा वापर केला जात आहे. मग तो रस्ता असो, सिग्नल असो की कोणतीही गल्ली. गेल्या काही वर्षांत ज्या प्रमाणात लहान मुलांचा भिक मागण्यासाठी वापर होतोय त्याचा विचार करता यामागे नक्कीच टोळ्या सक्रीय असाव्यात. मात्र, खेळण्या बागडण्याच्या आणि शिकण्याच्या वयात या मुलांना नको ती व्यसनं जडतात. तर काही जणांना जाणीवपूर्वक अपंग बनवले जाते. प्रगतीशील देशाच्या दृष्टीने ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असल्याचे सांगत सरकारचे याकडे लक्ष वेधण्यासाठी ही चळवळ सुरू केल्याचे चिरंजीवी संघटनेतर्फे सांगण्यात आले. भिवंडी तालुक्यातील बापगांवमध्ये असणाऱ्या मैत्रकूल संस्थेच्या आवारात सलोनी उपोषणाला बसली आहे. २६ डिसेंबरपर्यंत याठिकाणी हे उपोषण चालणार असून त्यानंतर दर आठवड्याला विविध भागात जाऊन एक दिवसाचे उपोषण केले जाणार आहे.