ठाणे - विषारी साप चावल्याने डोंबिवली येथील स्वरा वाघमारे नामक सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. महापालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयातील अतिदक्षता विभागात डॉक्टर आणि कर्मचारीच नसल्याने वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने स्वराला जीव गमवावा लागला. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी शास्त्रीनगर रुग्णालयात आज ठिय्या आंदोलन करीत पालिकेच्या कारभाराचा निषेध केला.
अतिदक्षता विभागाअभावी सर्पदंश झालेल्या सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू - thane
विशेष म्हणजे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे हे डॉक्टर, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हेच राज्याचे आरोग्यमंत्री, स्थानिक आमदार रविंद्र चव्हाण हेही राज्यमंत्री आणि महापालिकेत २५ वर्षे शिवसेना-भाजपची सत्ता असूनही कल्याण-डोंबिवलीतील महापालिका रुग्णालयात नागरिकांना पुरेशा सोयीसुविधा मिळत नसल्याचे आजच्या घटनेने समोर आले आहे.
विशेष म्हणजे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे हे डॉक्टर, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हेच राज्याचे आरोग्यमंत्री, स्थानिक आमदार रविंद्र चव्हाण हेही राज्यमंत्री आणि महापालिकेत २५ वर्षे शिवसेना-भाजपची सत्ता असूनही कल्याण-डोंबिवलीतील महापालिका रुग्णालयात नागरिकांना पुरेशा सोयीसुविधा मिळत नसल्याचे आजच्या घटनेने समोर आले आहे.
डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव ठाकुर्ली या परिसरात वाघमारे कुटुंब राहतात. काही दिवसांपूर्वीच ते येथे ठिकाणी राहण्यास आले होते. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता स्वरा घराच्या अंगणात खेळत असताना तिला विषारी सापाने दंश केला. आजूबाजूच्या रहिवाशांनी तिला त्वरित महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी इंजेक्शन व औषधोपचार केले. परंतु, तिची प्रकृती गंभीर असल्याने व महापालिकेतील अतिदक्षता विभाग कार्यरत नसल्याने तिला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलिवण्यास डॉक्टरांनी सांगितले. मात्र, तिच्या नातेवाईकांनी स्वराला खासगी रुग्णालयात दाखल केले. रात्री आठच्या सुमारास स्वराचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान, स्वराला महापालिकेच्या रुग्णालयातच योग्य उपचार तातडीने झाले असते तर तिचा जीव वाचला असता, असा आरोप करीत संतप्त झालेल्या स्वराच्या नातेवाईक व स्थानिकांनी शनिवारी शास्त्रीनगर रुग्णालयाच्या बाहेरच ठिय्या आंदोलन केले. महापालिकेच्या ढिसाळ आरोग्य यंत्रणेचा निषेध करीत त्यांनी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
पालिकेच्या रुग्णालयात डॉक्टर नाहीत. त्यामुळे कोणत्याच रुग्णाला वेळेवर उपचार मिळत नाहीत. स्वरा वाघमारे या बालिकेला वेळेवर उपचार मिळाले नाही. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. तिला दुसऱया रुग्णालयात हलविण्यासाठी पालिकेची रुग्णवाहिकाही नव्हती. पालिकेच्या रुग्णालयात केवळ नाक कान घसा यावरच उपचार केले जातात. पेशंटला कळवा अथवा मुंबईला हलविण्याचा सल्ला दिला जातो. आयसीयू विभाग नाही. सोनोग्राफी मशिन धुळखात पडली आहे. बालरोगतज्ञ नाही. सुरक्षा व्यवस्था नाही. त्यामुळे स्वराच्या मृत्यूला पालिकाच जबाबदार असून पालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंद नवसागरे यांनीकेली आहे.
गतवर्षी ३ एप्रिलला आम आदमी पक्षाने महापालिकेच्या रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांचा मुद्दा उचलत आपचे कल्याण लोकसभा क्षेत्र अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयावर मोर्चा नेला होता. त्यावेळी प्रशासनाने आरोग्य व्यवस्था सुधारण्याचे आश्वासन दिले होते. कल्याणचे खासदार यांनी देखील या मुद्याचा पाठपुरावा केला होता. त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने नागरिकांचा जीव जाण्याच्या घटना घडत आहेत ही लाजिरवाणी बाब आहे, अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे रवींद्र केदारे यांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात शास्त्रीनगर रुग्णालयाचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. चंद्रशेखर सावकारे यांनी सांगितले की, स्वरा वाघमारे या बालिकेला पायावर दोन ठिकाणी सापाने दंश केला होता. पेशंट सिरीअस होता त्यामुळे रुग्णालयात आल्यानंतर तिला सर्पदंशावरील इंजेक्शन व औषधे देऊन तातडीने उपचार करण्यात आले. सर्व उपचार केल्यानंतर पेशंटला आयसीयुची गरज होती. मात्र, डॉक्टर आणि कर्मचारीवर्ग नसल्याने पालिकेतील आयसीयू विभाग बंद आहे. त्यामुळे तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वराला कळवा येथील रूग्णालयात हलविण्यास सांगण्यात आले. १०८ रूग्णवाहिका अनेक महिन्यांपासून कार्यरत होती. मात्र, एक आठवडापासून ही सेवा काढण्यात आली आहे. मुंबईतील आरोग्य विभागाकडूनच ही काढण्यात आल्याचे समजले. मात्र, त्यासंदर्भात वरिष्ठांना सुचना देण्यात आली आहे. पेशंटवर उपचार करण्यात पालिका रूग्णालयातील डॉक्टरांकडून कोणतीच हयगय केलेली नाही.