ठाणे : भिमा गुलशन सोलंकी (वय ४५ वर्षे), सुरज अर्जुन सिलावट (वय २३ वर्षे), गोविंद दत्ता परमार (वय २२ वर्षे) हे तीन दरोडेखोर गुजरातमधील वडोदरा शहरातील खोडीयार नगर मधील रहिवासी आहेत. तर गणेश हिरा काशिद (वय ४५ वर्षे), कन्हैय्या हिरा काशिद (वय ३९ वर्षे), दोन्ही दरोडेखोर नागपूरचे रहिवासी आहेत. तसेच शंकर छेदीलाल परमार (वय २८ वर्षे) असे अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.
दरोडेखोरांच्या रेकीची माहिती मिळाली आणि.. :गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोऱ्या, दरोडे, खून यासारख्या गंभीर घटना घडत होत्या. कुळगाव बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक भोई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस गस्त वाढण्यात आली आहे. त्यातच २१ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास पोलीस पथक गस्तीवर असताना पोलीस नायक राजेंद्र जेधे यांना काही दरोडेखोर चोण व राहटोली गावाच्या हद्दीत रेकी करून दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक भोई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जी. एफ. तंवर, पोलीस हवालदार धनावडे, पोलीस नायक राजेंद्र जेथे आणि पोलीस शिपाई दीपक महाले या पथकाने दरोडेखोरांचा शोध सुरू केला.
पोलिसांकडून दरोडेखोरांच्या कारचा पाठलाग :ग्रामीण पोलिसांची तीन वेगवेगळी पथके तयार करून राहटोली परिसरात असताना २१ जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास सिल्वर रंगाची इनोवा कार संशयितरित्या चोण गावाकडून रहाटोली गावच्या दिशेने येताना दिसली. यामुळे पोलीस पथकाने कार चालकास हाताचा इशारा करून थांबण्यास सांगितले. मात्र, इनोवा कारचालकाने कार राहटोली दिशेने भरधाव वेगात पळविली. त्यानंतर पोलीस पथकाने फिल्मी स्टाईलने दुचाकी आणि पोलीस व्हॅनमधून पाठलाग सुरू केला. काही मिनिटातच पोलीस व्हॅनने दरोडेखोरांच्या कारला ओव्हरटेक करून आपली कार त्याच्यासमोर लावली आणि चहुबाजूने दरोडेखोरांना घेरले. त्यानंतर कारची पाहणी केली असता कारमध्ये लोखंडी चॉपर, चाकू, मिरचीपूड, दोरी, हातोडी, लोखंडी कटावणी असे दरोडा टाकण्यासाठी लागणारी हत्यारे मिळून आली. शिवाय नऊ मोबाईल आणि कार असा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
दरोडेखोर निघाले व्यावसायिक :पोलिसांनी २२ जुलै रोजी गुन्हा दाखल करून ६ दरोडेखोरांना अटक केली. यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक दरोडेखोर गुजरात आणि नागपूरचे असून ते विविध व्यवसाय करणारे व्यापारी असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आता हे दरोडेखोर कुठे आणि कसा दरोडा टाकणार होते, याचा तपास पोलिसांनी सुरू केला. शिवाय या दरोडेखोरांनी आणखी कुठे दरोडा टाकला का, याचाही तपास पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक भोई यांनी दिली आहे.
हेही वाचा:
- Gadkari Extortion Case : गडकरींना खंडणी मागणारा दहशतवादी अफसर पाशाच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ
- Pune Crime News : सहाय्यक पोलीस आयुक्ताने पत्नीसह पुतण्याचा केला खून, गोळी झाडून केली आत्महत्या
- Chandrapur Crime : चंद्रपुरात कोळसा तस्करी रॅकेट पुन्हा सक्रिय? गोळीबारात भाजप नेत्याच्या पत्नीचा मृत्यू, एकजण गंभीर