नवी मुंबई - ऐरोली सेक्टर ३ येथील श्रीराम विद्यालयाल शाळेतील व्यवस्थापकांनी नववीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना निकाल घेण्यासाठी शाळेत बोलवल्याने कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाले. शाळेने व्हॉट्सअॅपद्वारे पालकांना संदेश पाठविला होता, त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये गर्दी केली. कोरोना काळात कोणत्याही प्रकारची सभा, बैठक अथवा गर्दी न करण्याच्या शासनाच्या आदेशाला श्रीराम शाळेने पायदळी तुडविल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
निकालासाठी बोलवून पालकांवर 'फी'साठी टाकला दबाव -
इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना निकाल घेण्यासाठी श्रीराम शाळेतील व्यवस्थापकांनी व्हॉट्सअॅपद्वारे सूचना संदेश पाठविला होता. त्यानुसार वेगवेगळे वेळापत्रक पालकांना व्हॉट्सअॅपद्वारे पाठविले होते. त्यासुचनेमध्ये असे सुद्धा नमूद करण्यात आले होते की, निकाल घेण्याअगोदर विद्यार्थ्यांची पूर्ण फी भरावी. ही सूचना मिळताच शेकडो पालक शाळेत गोळा झाले. पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनाला जाब विचारताच बैठक रद्द करून मुख्याध्यापकांसह शाळा व्यवस्थापकांनी बाहेर धूम ठोकली.