ठाणे - भिवंडी तालुक्यातील खरबाव येथील श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वेठबिगारी पाशात अडकलेल्या 7 वीटभट्टी मजुरांना मुक्त केले आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच मजुरांना भिवंडीच्या तहसीलदारांनी मुक्तीचे दाखले देत पुनर्वसनाबाबत प्रक्रिया सुरू केली आहे.
चंदर, मोतीराम, गणपत आणि राजू (सर्व रा. बोट्याच्या वाडी ता. मोखाडी) या 4 जणांना खरबाव येथील नरेश वैती नावाच्या व्यक्तीने पैसे देऊन कामासाठी बांधून घेतले होते. गावात काम नसल्याने हतबल झालेले या मजूरांना नरेश वैतीने नावाच्या त्यांच्या मालकाने जबरदस्तीने बयाणा दिला होता. त्यात चंदरला आधी 2 हजार, गणेशोत्सवा दरम्यान, 12 हजार आणि दिवाळीपूर्वी 2 हजार असे एकूण 16 हजार रुपये इतका बयाणा देण्यात आला होता. याचप्रमाणे इतर 3 कुटुंबांना देखील दिले होते. भिवंडीतील घारबाव गावात असलेल्या या 7 वेठबिगारांना श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुक्त केले आहे. यासंदर्भात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा -दिल्ली अग्नितांडव: २८ मृतांची ओळख पटली, इमारतीचा मालक, मॅनेजरही अटकेत
मुक्त करण्यात आलेल्यांची नावे - चंदर बरफ याच्या सह पत्नी शेवंती बरफ, मोतीराम जाधव, काशी मोतीराम जाधव, राजू बुधा वाघ, भरती राजू वाघ आणि प्रकाश गणपत बरफ (सर्व रा. गोमघर बोट्याची वाडी)
सर्व मजुरांना भिवंडीचे तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी हे सर्व वेठबिगार मुक्त झाल्याचे शाश्वती दिली. तसेच पुनर्वसनाचे दाखले दिले. तर फिर्याद दाखल झाल्यानंतर मजूरांना आपल्या मूळ गावी मोखाड्यात बोट्याची वाडी येथे पोहोचवण्यात आले. यावेळी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस उल्हास भानुशाली, नम्रता भानुशाली, युवक जिल्हा अध्यक्ष प्रमोद पवार, तालुका सचिव मोतीराम नामकुडा उपस्थित होते.