ठाणे- टाळेबंदीच्या काळात अंत्योदय लाभार्थी तसेच गरिबांना मोफत धान्य मिळावे म्हणून शासनाने रेशन दुकानावर धान्य वाटपाची जबाबदारी सोपवली आहे. मात्र, काही रेशन दुकानदार लाभार्थ्यांना मिळणाऱ्या धान्यात डल्ला मारून अपहार करीत आहे. असाच एक प्रकार भिवंडी तालुक्यातील वेढे पाडा गावात श्रमजीवी संघटनेने उघड केला आहे.
मागील आठवड्यात तालुक्यातील पालखणे आणि चाणे गावात दोन रास्त भाव दुकानदारावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तालुक्यातील वेढे पाडा या गावात देखील धान्य अपहार सुरू असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानुसार संघटनेने भोंगळ कारभार उघड केला. लॉकडाऊन काळात गरिबांवर उपासमार सुरू आहे. अशात अनेक हात मदतीसाठी पुढे येत आहेत. गावात सारिका लाटे यांचे सरकारी रेशनचे दुकान आहे. दुकानात 165 अंत्योदय लाभार्थी आहेत. प्रत्येकाला 1 ते 2 किलो तांदूळ आणि गहू कमी दिल्याचा आरोप आहे. मोफत लाभार्थ्यांपैकी अनेकांना 5 ते 10 किलो धान्य कमी दिले आहे. हे सर्व लाभार्थी गरीब, मजूर, आदिवासी स्थलांतरीत मजूर आहेत.