ठाणे :राज्यात पावसाने कहर केला असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धबधब्याने डोंगरावरून कोसळत असल्याने पावसाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र, असे असतानाही काही नागरिक अत्यंत बेजबाबदारपणे वागत असून पावसाचा आनंद घेण्यासाठी धबधब्यावर मोठी गर्दी दिसून येत आहे. मुंब्रा येथील धरणावरही गर्दी असून मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या मुलांना घेऊन येतात, त्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.
पावसामुळे जनजीवण विस्कळीत : ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत असल्याने अनेक ठिकाणी जनजीवन ठप्प झाले आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी ठाकुर्ली, कल्याण दरम्यानच्या नाल्यात एका बाळाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली होती. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेकांचा संसार बुडाला. रायगड जिल्ह्यात इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली कुटुंबे गाडली गेली. सर्वत्र निसर्गाचा असा कोप होत असताना काही नागरिक मात्र अत्यंत बेफिकीरपणे वागत असल्याचे दिसून येत आहे.
जीवाला धोका :ठाण्याजवळील मुंब्रा बायपास रोडजवळील धबधब्यावर स्थानिकांची गर्दी होतांना दिसत आहे. या धबधब्यावर बंधारा बांधण्यात आल्याने येथे पाण्याचा खोल तलाव तयार झाला आहे. नागरिकांनी त्यावर चढू नये म्हणून प्रशासनाने तटबंदीभोवती तारेचे कुंपणही लावले आहे, मात्र स्थानिक मुले, काही वृद्ध नागरिक त्यावरून उड्या मारून तलावात पोहतांना दिसत आहेत. धरणातून खाली वाहणाऱ्या पाण्यात अनेक पालक आपल्या मुलांसोबत मस्ती करताना दिसत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी गेल्या काही वर्षांत अनेकांना जीव गमवावा लागला आहे,तरीही उत्साहामध्ये नागरिक स्वतःसह आपल्या मुलांचे प्राण देखील धोक्यात घालत आहेत.