ठाणे - महाराष्ट्रातील भाजपवाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मत मागतात, आणि कर्नाटक मधील भाजपवाले महाराजांचा पुतळा हटवतात, अशी सडेतोड टीका करत शिवसेनेने भाजपच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध नोंदवला.
कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील एका गावात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तेथील सरकारने हटवला. त्यावरून शिवसेनेने आज कल्याणमध्ये आंदोलन केले. यावेळी भाजप नेत्यांना सळो की पळो करून सोडू, असा इशाराही शिवसैनिकांनी दिला.
कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संतप्त शिवसैनिकांनी उग्र निदर्शने करत कर्नाटक सरकारचा निषेध केला. येडीयुरप्पा हाय हाय!! कर्नाटक भाजप सरकारचा निषेध अशा आशयाच्या जोरदार घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
एकीकडे महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे नाव घेऊन मत मागायची आणि दुसरीकडे रातोरात महाराजांचे पुतळे हटवायचे, अशा भाजप सरकारचा करावा तितका निषेध कमी असल्याचेही शिवसेनेतर्फे यावेळी सांगण्यात आले. तर कर्नाटक सरकारने लवकरात लवकर हा पुतळा बसवला नाहीतर शिवसेना कर्नाटकात घुसून आपल्या पध्दतीने हा पुतळा बसवले, असा इशाराही यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी माजी महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेते प्रकाश पेणकर, शहर शिवसेचे वरिष्ठ पदाधिकारी रवी कपोते यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.