ठाणे - शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदाची माळ जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली. यानंतर यामुळे एकनाथ शिंदे यांचे पक्षातील वजन वाढले असून येणाऱ्या काळात राज्यभरात सेनेच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये ते मोठी भूमिका बजावणार आहेत. रिक्षाचालक ते शिवसेना गटनेते असा एकनाथ शिंदेचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे... जाणून घेऊया एकनाथ शिंदेंचा राजकीय प्रवास...
आनंद दिघे यांच्या अपघाती मृत्यूनंतर जिल्ह्यात शिवसेना संपल्याचे चित्र असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख या नात्याने शिवसेना एकसंध ठेऊन मजबूत केली. यामुळे 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेची प्रथमच एकहाती सत्ता आली.
तसेच शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण-डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, भिवंडी महापालिका, अंबरनाथ नगरपरिषद, बदलापूर नगरपरिषद अशा सर्व ठिकाणी शिवसेनेला सत्ता मिळवण्यात हातभार लागला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि सेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यामुळे प्रभावित होऊन 1980च्या दशकात शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीच्या काळात एकनाथ शिंदे हे रिक्षा चालवून उदरर्निवाह करत होते.
*
1984 साली किसननगर येथे शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती; सीमा आंदोलनात तुरुंगवास
*1997 मध्ये पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवड
*2001 मध्ये सभागृहनेतेपदी निवड; सलग तीन वर्षे पद सांभाळले
*2004 मध्ये तत्कालीन ठाणे विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार
*2005 साली शिवसेनेचे ठाण्याच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती
*2009 मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघातून पुन्हा आमदार