ठाणे- कल्याण डोंबिवली महापालिकेत लोकप्रतिनिधीची राजवट आल्यापासून सत्ताधारी असलेले युतीचे नगरसेवक लाचखोरीत अव्वल असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीतून समोर आले आहे. त्यातच आज पुन्हा एका शिवसेना नगरसेवकाने एक लाखांची लाच मागितल्याप्रकरणी ठेकेदाराने लाचलुचपत नवी मुंबई विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीनुसार खडकपाडा पोलीस ठाण्यात नगरसेवकावर गुन्हा दाखल झाल्याने शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ माजली आहे.
केडीएमसीतील युतीचे नगरसेवक लाचखोरीत अव्वल; शिवसेना नगरसेवकावर लाचखोरीचा गुन्हा
कल्याण डोंबिवली महापालिकेत लोकप्रतिनिधीची राजवट आल्यापासून सत्ताधारी असलेले युतीचे नगरसेवक लाचखोरीत अव्वल असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
गोरख जाधव, असे लाखचोरीचा गुन्हा दाखल झालेल्या शिवसेना नगरसेवकाचे नाव असून तो अटाळी गावातील प्रभाग क्रमांक ७ मधून निवडून आला आहे. लाचखोर जाधवच्या प्रभागात एका संबंधीत कंत्राटदाराच्या कंपनीला महापालिकेकडून रस्ता आणि गटार बांधणीचे काम देण्यात आले होते. या कामामध्ये कोणताही अडथळा न आणण्यासाठी कंत्राटदाराला मिळणाऱ्या एकूण रकमेच्या 10 टक्के म्हणजेच 1 लाख रुपये रकमेची नगरसेवक गोरख जाधव याने मागणी केल्याचे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याबाबत तक्रारदाराने नवी मुंबई लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्याची पडताळणी झाल्यानंतर आज सकाळी पावणे बाराच्या सुमारास लाचलुचपत विभागाने नगरसेवकावर खडकपाडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध 1988 च्या कलम 7 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण डोबिंवली महापालिकेत आतापर्यंत लाचखोरी प्रकरणामध्ये 33 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यापूर्वी लाचलुचपत विभागाने पकडले आहे. तर 1995 साली महापालिकेत लोकप्रतिनिधीची राजवट आल्यापासून 1997 साली काँग्रेसच्या दिवंगत नगरसेविका ब्रदूनिशा शिपाई यांना ठेकेदाराकडून लाच घेतना अटक केली. त्यानंतर एप्रिल 2014 शिवसेना पुरस्कृत माजी अपक्ष नगरसेवक विद्याधर भोईर यांना एका महिलेकडून बांधकाम न पाडण्यासाठी 4 लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. तर ऑक्टोबर 2016 ला प्रभाग क्र. 44 नेतिवली टेकडीचे विद्यमान भाजप नगरसेवक गणेश भाने यांना अवैध बांधकामाविरोधात परवानगी देण्यासाठी संबधित कंत्राटदाराकडून 1 लाख रुपयांची लाच घेताना अटक केली असतानाच आज पुन्हा गोरख जाधव या शिवसेनेच्या नगरसेवकावर 1 लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी निष्पन्न झाल्याने खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने सत्ताधारी शिवसेना भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.