ठाणे- मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. या प्रकरणावरून सेनेचे आमदार, खासदारांनी मनसेला प्रतिआव्हान दिल्यानंतर रविवारी शिवसेना महिला आघाडीनेदेखील यात उडी घेतली. पालकमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत त्यांना उचलून दाखवण्याची हिंमत केल्यास तंगडे तोडू, असा इशारा महिला आघाडीनेच्या वतीने अविनाश जाधव यांना दिला आहे.
मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना अटक झाल्यानंतर त्यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्ल अपशब्द वापरत केलेल्या टीकेमुळे शिवसेनेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. स्वतः पालकमंत्री शिंदे यांनी जाधव यांना फार महत्त्व न देण्याची भूमिका घेतली असली तरी, शिवसैनिक आणि पदाधिकारी मात्र संतापले आहेत. शिवसेनेचे खासदार राजन विचारे आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी जाधव यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर देत, एका रात्रीत केवळ व्हिडिओ बाईट देऊन कोणी नेता बनत नाही, असा टोला लगावला होता. तर, उचलून न्यायची भाषा करणाऱ्यांना त्यांची लायकी दाखवून देऊ, असा इशारा शिवसेना खासदार राजन विचारे यांनी दिला. लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्याचे स्वातंत्र्य असले तरी, याचा गैरफायदा कुणी घेऊ नये. वसंत डावखरे ,गणेश नाईक संपले आता तुम्हीही संपाल, आणि संपल्यावर घरातून उचलून घेऊन जाऊ. पालकमंत्र्यांबद्दल बोलणे चुकीचे असून आम्ही गप्प बसणाऱ्यापैकी नाही, असा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला होता.