ठाणे Shiv Sena Dasara Melava: शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे ( Eknath Shinde Vs Uddhav Thackeray ) यांच्यात दसरा मेळावा कुठं होणार, यावरुन मोठा वाद सुरू आहे. यावर मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यावरुन माघार घेत वाद टाळला आहे. शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार असल्याचं शिक्कामोर्तब केलं आहे. 2022 चा शिंदे गटाचा मेळावा हा बांद्रा कुर्ला संकुलात पार पडला होता. मात्र या वर्षी शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आल्यानं संघर्ष पेटणार असं दिसत असताना शिंदे गटानं माघार घेत आझाद मैदानात दसरा मेळावा घेणार असल्याचं स्पष्ट केलं.
दसरा मेळाव्यावरुन शिवसेनेत संघर्ष :शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर कोणत्या गटाचा दसरा मेळावा कुठं होणार यावरुन वाद रंगताना पाहायला मिळत आहे. 2022 मध्ये शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यावरुन शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आले. यानंतर ठाकरे गटानं न्यायालयात धाव घेत शिवतीर्थावर दसरा मेळाव्याची परवानगी काबीज केली. तर 2022 चा शिंदे गटाचा मेळावा हा बांद्रा कुर्ला संकुलात पार पडला. यावर्षी देखील दसरा मेळावा कोणत्या गटाचा नेमका कुठं होणार, असा प्रश्न होता. यासाठी दोन्ही गटांनी शिवतीर्थावर आपला मेळावा व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत अर्ज केले. यानंतर शिवतीर्थावर दसरा मेळाव्याची परवानगी अखेर ठाकरे गटानं मिळवली. शिंदे गटाचा दसरा मेळाव्यासाठी आधी चर्चगेट जवळील क्रॉस मैदान निश्चित करण्यात आलं. मात्र आता शिंदे गटाचा दसरा मेळावा हा मुंबईतील आझाद मैदानावर होणार असल्याचं शिक्कामोर्तब खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.