महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कल्याण ग्रामीणमधून शिवसेनेने उमेदवार बदलला; आमदार सुभाष भोईरांचा पत्ता कट? - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना एबी फॉर्म दिला होता. मात्र, आज केडीएमसीचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना पक्षाने एबी फॉर्म दिल्याने खळबळ उडाली आहे. विद्यमान आमदार सुभाष भोईर यांच्याविरोधात ग्रामीण भागात मोठी नाराजी होती. त्यांना पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर कालच ६३ गावांतील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे देत बंडाचा इशारा दिला होता.

कल्याण ग्रामीणमधून शिवसेनेने उमेदवार बदलला

By

Published : Oct 3, 2019, 11:52 PM IST

ठाणे - कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेने अचानक उमेदवार बदलला आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना एबी फॉर्म दिला होता. मात्र, आज केडीएमसीचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना पक्षाने एबी फॉर्म दिल्याने खळबळ उडाली आहे. तसेच आमदार सुभाष भोईरांचा पत्ता कट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कल्याण ग्रामीणमधून शिवसेनेने उमेदवार बदलला

विद्यमान आमदार सुभाष भोईर यांच्याविरोधात ग्रामीण भागात मोठी नाराजी होती. त्यांना पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर कालच ६३ गावांतील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे देत बंडाचा इशारा दिला होता. त्यानंतर अचानक खासदार श्रीकांत शिंदे हे रमेश म्हात्रे यांना घेऊन डोंबिवलीत आले आणि पक्षाने म्हात्रे यांना अधिकृत उमेदवारी दिल्याची घोषणा केली. त्यामुळे आता सुभाष भोईर यांचा पत्ता पक्षाने कट केल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा -उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी उन्मेष बागवेंचे जनतेकडे राजीनामापत्र

सुभाष भोईर यांनी 1 तारखेला पक्षाच्या एबी फॉर्मसह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याला काही तास उलटत नाहीत तोच कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे हे या मतदारसंघातून सेनेचे अधिकृत उमेदवार असल्याची माहिती दिली आहे. तसेच कल्याण ग्रामीण मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयाला आपण रमेश म्हात्रे यांच्यासह भेट दिल्याचेही खासदार शिंदे यांनी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले. तसेच, मातोश्रीवरून आता कल्याण ग्रामीणचा उमेदवार बदलण्यात आला असून रमेश म्हात्रे हेच इथले अधिकृत उमेदवार असणार, असेही खासदार शिंदे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा -शरद पवारांचा छळ केल्याचा बदला जनता घेईल, जितेंद्र आव्हाडांना अश्रू अनावर

या सर्व घडामोडी घडत असताना विद्यमान आमदार सुभाष भोईर यांच्या समर्थनार्थ महायुतीतील सेना, भाजप, रिपाईं या घटक पक्षांच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये पक्षाने सुभाष भोईर यांना एबी फॉर्म दिल्याने आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच, खासदार श्रीकांत शिंदे यांनी रमेश म्हात्रेंबाबत केलेल्या घोषणेची आम्हाला कोणतीही माहिती नसल्याचे शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे यांनी सांगितले. या सर्व घडामोडीनंतर उद्या उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस असून कल्याण ग्रामीणमध्ये नेमकं अधिकृत उमेदवार कोण या प्रश्नावरील मळभ उद्यालाच दूर होईल आणि सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा -भाजपमध्ये बंडाळीची लाट; विद्यमान आमदारांसह 2 जिल्हाध्यक्ष युतीविरोधात निवडणुकीच्या रिंगणात

सुभाष भोईर यांना पक्षाने एबी फॉर्म परत मागितला होता, मात्र त्यांनी बाहेर असल्याची खोटी कारणं देत परस्पर अर्ज भरून टाकला, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी संतापून याठिकाणी नवीन उमेदवार दिला, अशी शिवसेनेच्या सूत्रांची माहिती आहे. या सगळ्याबाबत आमदार सुभाष भोईर यांनी मात्र, काहीही बोलायला नकार दिला आहे. तर, कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करण्यासाठी पक्षाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी सुभाष भोईर यांचे समर्थक असलेले तालुकाप्रमुख प्रकाश म्हात्रे यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details