प्रतिक्रिया देताना शंभू राज देसाई पालकमंत्री ठाणे ठाणे : एकनाथ शिंदे गटाकडून कार्यकारणी स्थापन करण्यापासून कार्यकारीनीची बैठक ही प्रथमच पार पडली आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या मुख्य नेतेपदी नियुक्त करण्यात आली आहे. आनंदाश्रम हे आनंद दिघे यांचा कार्यालय असून याच कार्यालयातून आनंद दिघे हे ठाण्याचा संपूर्ण कारभार सांभाळायचे. याच कार्यालयातून एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाला देखील सुरुवात झालेली आहे. त्यामुळे ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले हेच आनंद आश्रम आता इथून पुढे शिवसेनेचा संपूर्ण कारभार सांभाळणार आहे.
शिवसेनेचे मुख्य कार्यालय : गुवाहाटीवरून संपूर्ण सत्ता संघर्षानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वच शिंदे गटातील आमदार यांनी याच आनंदाश्रमामध्ये येत आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे दर्शन घेतले होते. त्यामुळे आनंद दिघे यांचं हे आनंदाश्रम शिंदे गटासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठी शिवसेनेचे मुख्य कार्यालय म्हणून आनंदाश्रमची निवड करण्यात आली आहे. येत्या काळामध्ये याच आनंदाश्रमामध्ये शिंदे गटाच्या अनेक बैठकीत देखील होऊ शकतात. याच कार्यालयातून संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार शिवसेनेचा सुरू असणार आहे. तर ज्यांनी शिवसेना उभी केली त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून काम केले, अनेक वार घेतले कष्ट घेतला अशा आनंद दिघे यांच्या कार्यालयातून शिवसेनेचे कामकाज चालत असेल तर त्याच्यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील काही मुख्य नेत्यांनी दिलेली आहे.
नुकतेच झाले आहे नूतनीकरण :आनंद दिघे यांच्या आश्रमाचे काही महिन्यांपूर्वीच नूतनीकरण झाले आहे. त्यानंतर जुन्या आश्रमातील काही वस्तू पुन्हा नागरिकांना पाहता येणार आहेत. ज्या ठाण्याच्या राजकारणाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशभरात होती. त्याच ठाण्याचे राजकारण हे आनंद दिघे हे असताना ज्या खोलीतून व्हायचे किंवा ज्या खुर्चीत बसून व्हायचे. त्या खोलीमध्ये आनंद दिघे यांनी वापरलेल्या किंवा यांना भेटवस्तू मिळालेल्या सर्वच गोष्टी ठेवण्यात आलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने आनंद दिघे ज्या खुर्चीवरून काम करायचे ती खुर्ची आहे, त्या खुर्चीच्या बाजूला आनंद दिघे यांच्या गुरूंची खुर्ची आहे तिचा फोटो देखील ठेवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे आनंद दिघे यांचे शस्त्र त्यांना मिळालेल्या भेटवस्तूमध्ये सर्वात जास्त त्रिशूल आहेत, ते त्रिशूल देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. आनंद दिघे यांचे जुने फोटो त्याचप्रमाणे आनंद दिघे यांनी स्वतः लिहिलेले काही पत्र यांचा देखील या संपूर्ण संग्रहामध्ये समावेश आहे.
तरूणांच्या गळ्यातील ताईत :सत्तर ऐंशी दशकातील तो काळात मराठी माणूस बाळासाहेबांच्या विचाराने भारावला होता. बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे शब्द मराठी मनात स्वाभिमानाचा अंगार चेतवत होते. अर्थात मुंबईलगत असलेल्या ठाणे जिल्ह्यावरही त्याचे ठळक परिणाम दिसायला लागले होते. याच परिणामांनी ठाणे शहरावर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला. सतीश प्रधान शिवसेनेचे आणि ठाणे शहराचे पहिले महापौर झाले. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. बाळासाहेबांच्या विचारांचे वेड लागलेला, सर्वसामान्य घरातील सामान्य अंगकाठीचा एक तरुण झंझावात पुढे येत होता. त्याने त्याचे संपूर्ण आयुष्य शिवसेना आणि बाळासाहेब यांच्यासाठी झोकून द्यायचे ठरविले होते. आपल्या काम करण्याच्या विशिष्ट शैलीने तो अल्पकाळातच तरुणांच्या गळ्यातील ताईत झाला. सर्वसामान्य शिवसैनिक, उपजिल्हाप्रमुख ते जिल्हाप्रमुख अशी काहीवेळातच त्याने झेप घेतली. साक्षात शिवरायांची काम करण्याची दरबारी पध्दत त्याने अनुसरली आणि बघता बघता आनंद दिघे हे नाव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात दुमदुमू लागले. दिघे यांची असलेली अध्यात्मिक बैठक आणि कट्टर हिंदुनिष्ठतेने त्यांना धर्मवीर ही पदवी आपसूकच चिकटली.
'आनंद आश्रम' अहोरात्र खुला :आनंद दिघे यांचा आनंद आश्रम नागरिकांसाठी अहोरात्र खुला होता. त्याची देखभाल करण्यासाठी अनेक लोक तैनात असायचे. याच ठिकाणी राज्यभरातील विविध भागातून लोक आपल्या अडचणी सोडवण्यासाठी येत असत. त्यांनी अनेक नेत्यांना कानफटवले देखील आहे. आज हयात असलेल्या अनेक नेत्यांना त्यांच्या विरोधात कानफटवले असल्याचेही आनंद आश्रमातील लोक सांगतात. मात्र त्यामागे अन्याय सहन करणार नाही, अन्याय करू देणार नाही हीच भावना असल्याचे ठाणेकर नागरिक सांगत आहेत. आनंद दिघे यांची मैत्री सर्वांशी होती. त्यामुळे ते अजातशत्रू होते. वसंत डावखरे हे सुरूवातीचे काँग्रेस आणि मग राष्ट्रवादीचे नेते होते. ते आनंद दिघे यांचे जिगरी दोस्त होते आणि त्यांची दोस्ती ही अनेकांनी अनुभवली आहे.
आता रंगणार राजकीय खलबते :ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांसोबत राज्यातील अनेक महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत शिवसेनेची अनेक राजकीय खलबत्ता या आनंदाश्रमामध्ये आता होणार आहेत. आनंदाश्रमामध्ये मागच्या अनेक दशकांपासून सर्वपक्षीय नेत्यांचा वावर होता. त्याचे कारण हे आनंद दिघे आणि पक्षाच्या व्यतिरिक्त असलेल्यांचे काम होते. आनंद दिघे यांना मानणारा वर्ग सर्वच पक्षांमध्ये होता. त्यामुळे त्या काळात आनंदाश्रमाला सर्वच राजकीय नेत्यांनी भेट दिलेली होती. आता मात्र या आनंदाश्रमाचं रूपांतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यालय म्हणून होणार आहे. त्यामुळेच त्यांच्या पक्षाची राजकीय खलबते या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
हेही वाचा : Aaditya Thackeray on CM : एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री की गुजरातचे?; आदित्य ठाकरेंचा प्रहार