ठाणे :कचोरी म्हटले की, सगळ्यात पहिले आठवण होते ती विदर्भातील शेगावच्या कचोरीची. याच शेगावच्या कचोरीचा अस्सल स्वाद अनुभवायला मिळतो चक्क ठाण्यामध्ये. ठाण्यातील नौपाडा येथील शेगांव कचोरी सेंटर गेली १४ वर्षे अविरतपणे ठाणेकरांना अस्सल शेगांव कचोरीची लज्जत मिळवून देत आहेत. ठाणेकर नागरिक हा खवय्या म्हणून ओळखला जातो. कारण ठाण्यातील प्रत्येक गल्लीमध्ये एक खाऊगल्ली ही असतेच.
खाऊगल्ल्यांमध्ये शेगांव कचोरीचे स्टॉल :प्रत्येक खाऊगल्लीमध्ये तेथील विशिष्ट स्थानिक समुदायाच्या आवडीचे पदार्थ विकले जातात. जसे सिंधी समाज प्रामुख्याने असलेल्या भागात दलपक्वान, पापडी चाट सारखे पदार्थ मिळतात. तर, गुजराती बहुल भागात ढोकळा, फाफडा जिलेबी सारख्या पदार्थांचे स्टॉलची गर्दी पहायला मिळते. परंतु आत्तापर्यंत याला वडापाव हा एकच अपवाद होता, जो सगळीकडेच आढळतो. परंतु गेल्या काही वर्षात याच खाऊगल्ल्यांमध्ये शेगांव कचोरीचे स्टॉल आपले वेगळेपण दाखवत आहेत.
ठाणेकरांना कचोरीची भुरळ : जे भाविक गजानन महाराजांच्या पावनभूमी शेगावात जाऊन येतात. त्यांना या कचोरीची भुरळ पडलेली असतेच. परंतु ज्या खवय्यानी एकदा का या खुसखुशीत कचोरीची चव घेतली, तो या कचोरीचा आजीवन चाहता झालाच म्हणून समजा. श्रीक्षेत्र शेगाव येथील रेल्वे स्थानाका समोरील आर एस शर्मा शेगांव कचोरी यांनी ५० वर्षांपूर्वी या कचोरीची सुरुवात केली असे सांगतात. इथेच अस्सल शेगांव कचोरी मिळते असे येथील रिक्षावाले आवर्जून दावा करतात. बहुतांश ठाणेकरांना या कचोरीची फारशी माहिती नसताना नौपाडा भागात एका छोटयाशा दुकानातून शेगांव कचोरी विक्रीला सुरुवात झाली आणि ठाणेकरांना या कचोरीची भुरळ पडली.