ठाणे - भिवंडीत मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असतानाच शांती नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे पंधरा लाख रुपये किंमतीचे विविध मोबाईल कंपन्यांचे शंभर मोबाईल चोरट्यांकडून हस्तगत करण्यास शांती नगर पोलिसांना यश आले आहे. शुक्रवारी (दि. 24 सप्टेंबर) सायंकाळी भिवंडी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण उपस्थितीत पोलीस संकुल येथे नागरिकांना हे मोबाईल परत करण्यात आले.
पोलीस पथके तयार करून तांत्रिक लोकेशनच्या आधारे मोबाईल हस्तगत
शांती नगर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी शांती नगर पोलिसांना मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा सखोल तपस करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांनतर शांती नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी तपास पथके तयार करून शांती नगर पोलीस ठाण्यांतर्गत चोरीला गेलेले शंभर मोबाईल चोरट्यांकडून हस्तगत केले. शुक्रवारी पोलीस संकुल येथे नागरिकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. हरवलेले व चोरीला गेलेले मोबाईल परत मिळाल्याने मोबाईलधारकांनी भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांच्यासह शांती नगर पोलीस प्रशासनाचे आभार मानले. यावेळी शांती नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण काबाडी, पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश जाधव व इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा -ठाणे - रस्त्यांची दुरावस्था पाहून पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल