महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शहापूर : शिवबंधनात अडकलेल्या आमदारांविरोधात भावानेच थोपटले दंड, शिवसेनेतही बंडाळीचा सामना - पांडुरंग बरोरा विरूद्ध भास्कर बरोरा

शहापूर विधानसभेचे आमदार पांडुरंग बरोरा हे शिवसेनेत गेल्यानंतर आता त्यांच्याविरोधात त्यांचे सख्खे चुलत बंधू भास्कर बरोरा यांनी दंड थोपटले आहेत. दुसरीकडे, आमदार पांडुरंग बरोरा आणि  शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांच्यात विधानसभेच्या तिकिटावरून अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे.

शिवबंधनात अडकलेल्या आमदाराविरोधात भावानेच थोपटले दंड

By

Published : Sep 14, 2019, 5:37 PM IST

ठाणे -शहापूर विधानसभेचे आमदार पांडुरंग बरोरा हे शिवसेनेत गेल्यानंतर आता त्यांच्याविरोधात त्यांचे सख्खे चुलत बंधू भास्कर बरोरा यांनी दंड थोपटले आहेत. पांडुरंग बरोरा यांना शिवसेनेतून उमेदवारी मिळाली तर, त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीतून उमेदवारीसाठी अर्ज दाखल करेन, असा दावा भास्कर बरोरा यांनी केला आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत शहापूरमध्ये भावा विरुद्ध भाऊ अशी चुरशीची लढत पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.

दुसरीकडे, आमदार पांडुरंग बरोरा आणि शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांच्यात विधानसभेच्या तिकिटावरून अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा जाधव यांनीही बरोरांच्या उमेदवरीला विरोध केला आहे. बरोरांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे माजी आमदार दौलत दरोडा यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा -किरीट सोमय्यांनी सेनेला पुन्हा डिवचले; म्हणाले..

शहापूर विधानसभा मतदारसंघ हा १९८० पासून अनुसूचित जमातीच्या उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. शहापूर विधानसभा मतदारसंघात दिवंगत महादू बरोरा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ होते, असे सांगितले जाते. पुढे त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र पांडुरंग बरोरा हे या मतदारसंघातून २०१४ च्या निवडणुकीत निवडून आले होते. बरोरा यांची शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार दौलत दरोडा यांच्यासोबत लढत झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून येऊनही आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पांडुरंग बरोरा यांनी आमदार पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरोडांनाच विधानसभेची उमेदवारी देण्यात यावी, अशी शहापूर शिवसेनेतील एका गटाची मागणी आहे. पांडुरंग बरोरा यांना पक्षाने उमेदवारी दिलीच, तर शिवसेनेत अंतर्गत बंडखोरी उफाळून येण्याची चिन्हे नाकारता येत नाहीत. दौलत दरोडा व पांडुरंग बरोरा यांचे शिवसेनेतून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू असतानाच शिवसेनेतीलच अविनाश शिंगे, गजानन गोरे, ज्ञानेश्वर तळपाडे, चंद्रकांत जाधव, राजेंद्र म्हसकर, मंजुषा जाधव हेदेखील इच्छुकांच्या रांगेत उभे आहेत.

हेही वाचा -सुप्रिया सुळेंसोबत गैरवर्तन प्रकरण; ठाण्यातील राष्ट्रवादी आघाडीच्या महिलांनी काळ्या साड्या घालून केला निषेध

तालुक्यात शिवसेनेसोबतच भाजपमधून अशोक इरनक, रंजना उघडा, नरसू गावंडा हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. पक्षाने त्यांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. तसेच राष्ट्रवादीतून भास्कर बरोरा, तर काँग्रेस पक्षातून पद्माकर केवारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून महादू शेवाळे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षातून नितीन काकरा हे इच्छुक उमेदवार आहेत. एकंदरीतच शहापूर विधानसभा मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांमध्ये उमेवारीचा पेच अधिकच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील काळात उमेदवारीची माळ कोणता पक्ष कोणत्या इच्छुकाच्या गळ्यात टाकतो, याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details