ठाणे: पालघर जिल्हा असो की, ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ या चारही तालुक्यातील बहुतांश आदिवासी गावपाडे डोंगराच्या कुशीत वर्षोनुवर्ष वसलेले आहेत. या पाड्यातील गावकरी आपल्या पाड्यात राहणाऱ्या गरोदर माता, आजारी रुग्ण, वृध्द व्यक्ती यांना पावसाळा संपेपर्यंत आपल्या नातेवाईकांकडे पाठवतात. कारण रात्री बेरात्री आजारी व्यक्तीस किंवा गरोदर मातेस ३ किलोमीटर बांबूच्या डोलीने पायपीट करत रुग्णालयात घेऊन जावे लागते.
आदिवासी पाडे सुविधांपासून वंचित आहेत: जिल्ह्यातील शेकडो आदिवासी पाडे हे, रस्ते, वीज, पाणी, आरोग्य यासारख्या सुविधांपासून वंचित आहेत. गरोदर माता, आजारी रुग्ण यांना वैद्यकीय उपचारासाठी जंगल दऱ्या खोऱ्यातून चिखल तुटवत बांबूची डोली करून, ४ किलोमीटर दूरवर पायपीट करावी लागते. त्यानंतर तिथून पुढे एखाद्या वाहनाने इच्छित स्थळी जाण्याची वेळ आदिवासी बांधवावर येते. पावसाळा असल्याने नद्या ओढ्याना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. बहुतांश गाव पाड्यात आरोग्य सेवा पोहचणे अशक्य झाले आहे. तसेच शेतीची कामे सुरू आहेत. यामुळे शहापूर तालुक्यातील सावरखूट गावातील गावकऱ्यांनी आपल्या पाड्यात असलेल्या गरोदर माता, आजारी व्यक्तींना आपल्या नातेवाईकांकडे पाठविले आहे.