नोकराच्या हत्येप्रकरणी प्रतिक्रिया देताना पोलीस अधिकारी ठाणे :याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हत्येसह पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मालकासह दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणी मालकासह एकाला अटक करण्यात आली असून दुसरा साथीदार फरार झाला आहे. नितीन मनोहर पाटील (रा. हेदुटणे), विजय गणपत पाटील अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अभिषेक प्रदीप लाड उर्फ बन्नी असे फरार असलेल्या आरोपीचे नाव आहे. तर संतोष सुदाम सरकटे (वय ४५, रा. हेदुटणे, बदलापूर) असे हत्या झालेल्या कामगाराचे नाव आहे.
नोकराला मरेपर्यंत मारहाण :मृतक संतोष सुदाम सरकटे हा कल्याण तालुक्यातील हेदुटणे गावाजवळील आरोपी नितीन मनोहर पाटील यांच्या मालकीच्या फार्महाऊसवर पाण्याचे किती टँकर भरले याच्या नोंदी ठेवण्याचे काम करीत होता. आरोपी मालक नितीन यांनी संतोष यांच्याकडे आपली रिव्हॉल्वर ठेवण्यास दिली होती. मालक नितीन यांना रिव्हॉल्वरची गरज असल्याने त्यांनी संतोषकडे त्याची मागणी केली. त्यातच १० जानेवारी रोजी मृत संतोष याने दारू पिल्याने नशेत रिव्हॉल्वर कुठे ठेवली आहे हे सांगता येत नव्हते. त्यामुळे सतत विचारणा करून संतोष रिव्हॉल्वर देत नसल्याने संतप्त झालेला मालक नितीनने कामगार संतोषला बेदम मारहाण केली. या कृत्यात नितीनचे साथीदार आरोपी विजय, अभिषेक सहभागी झाले. त्यांनी काठी, लाथा-बुक्क्यांनी संतोषला मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी त्याला कोळेगाव मधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. येथे डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हत्या करून पुरावा केला नष्ट :घटनेनंतर नोकराची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतक संतोषचा मृतदेह डोंबिवलीतील स्मशानभूमीत नेण्यात आला. तेथे आरोपींनी आवश्यक कागदपत्र न दाखल करता पार्थिवाचे दहन केले. शिवाय या प्रकरणाविषयी कोठेही उघडपणे बोलले असता जीवे मारू अशी धमकी आरोपींनी मयत संतोषचा मुलगा सागर आणि त्याच्या कुुटुंबीयांना दिली होती. आरोपींच्या धमकीला घाबरून मृतक संतोषच्या कुटुंबीयांनी त्यावेळी तक्रार दिली नव्हती. मात्र, काही दिवसांनी मुलगा सागर याने ठाणे गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दिला. त्या तक्रारीवरुन गुन्हे शाखा पोलिसांनी तपास सुरू केला असता, आरोपी मालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी केलेले कृत्य समोर आले.
आरोपींना अटक, त्या डॉक्टरांची होणार चौकशी :तक्रार दाखल झाल्यानंतर एसीपी सुनील कुऱ्हाडे यांनी मानपाडा पोलिसांच्या पथकासह या प्रकरणाचा सखोल तपास केला. यामुळे सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. यानंतर मानपाडा पोलीस ठाण्यात १९ जुलै रोजी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून मालक नितीन आणि त्याचा साथीदार विजय या दोघांना अटक करण्यात आली. तर तिसरा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी त्या खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी पोलिसांना न कळताच आरोपीच्या ताब्यात मृतदेह दिल्याने त्यांचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती एसीपी सुनील कुऱ्हाडे यांनी दिली आहे.
हेही वाचा:
- Death Of Student : बाकावर बसण्याचा वाद, वर्ग मित्राच्या मारहाणीत सातवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
- Twelve Robbers Caught : दरोड्याच्या तयारीत असलेले बारा दरोडेखोर जेरबंद
- Sambhajinagar Crime : संभाजीनगरमध्ये लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ: पोलिसांच्या उपाययोजना फेल?