ठाणे- कल्याण लोकसभेत दुसऱ्यांदा मिळालेल्या यशाचे श्रेय गेल्या ५ वर्षांत केलेल्या विकासकामांना, आणि महायुतीतील कार्यकर्त्यांच्या आहोरात्र मेहनतीला आहे. त्यामुळेच मला गेल्या वेळेपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून पुन्हा एकदा कल्याणची सुभेदारी राखण्यात यशस्वी झालो, अशी प्रतिक्रिया कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
कल्याण लोकसभा मतदारसंघाची सुभेदारी पुन्हा एकदा आपल्याकडे राखण्यात महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना यश आले आहे. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केवळ आपली सुभेदारीच कायम राखली नाही तर गेल्या निवडणुकीपेक्षा विक्रमी मताधिक्य मिळवल्याचे गुरुवारी झालेल्या मतमोजणीच्या रात्रीपर्यंतच्या आकडेवारीवरून दिसून आले. गेल्या दोन निवडणुकीत याठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. कल्याण हा शिवसेनेचा गड मानला जातो. यंदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीकडून पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून बाबाजी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. बहुजन समाज पक्ष आणि वंचित आघाडीनेही आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते.