ठाणे: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहिता शबीना दानिश शेख (वय २९) हिचे दानिश याच्याशी २०१९ मध्ये निकाह झाला होता. ती भिवंडीतील विठ्ठल नगर परिसरात सासरच्या मंडळीसह राहत आहे. तिच्या लग्नात वडिलांनी हुंडा कमी दिल्याच्या रागातून सासरच्या मंडळींनी तिचा वारंवार शारिरीक आणि मानसिक छळ करून शिवीगाळ करीत होते. पती दानिश वेळोवेळी विवाहितेला मारहाण करून शिवीगाळ करीत होता. अखेर पती आणि सासरच्या जाचाला कंटाळून विवाहिता शबीनाने सासरच्या मंडळींविरुद्ध भोईवाडा पोलीस ठाण्यात १९ एप्रिल रोजी तक्रार दिली.
चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस:विवाहिता शबीनाच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून आरोपी पतीसह सासरच्या मंडळींना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश गायकर करीत आहेत.
तिहेरी तलाकचे मोबाईल चित्रीकरण:भिवंडी शहरात एका पतीने तिहेरी तलाक प्रक्रियेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून प्रेयसी आणि पत्नीच्या कुटुंबासमोरच पत्नीला तलाक दिल्याची घटना घडली. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात आरोपी पतीसह त्याच्या प्रेयसीविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एजाज अन्सारी (वय ३२) आणि त्याची प्रेयसी समीना मोमीन असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर नसरीन बानो एजाज अन्सारी (वय ३०) असे पीडित पत्नीचे नाव आहे.
लग्नानंतर तरुणीशी प्रेमसंबंध: पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित नसरीन बानो आणि आरोपी एजाज यांचे निकाहपूर्वी प्रेमसंबंध असल्याने त्यांचा ९ एप्रिल २०१० रोजी निकाह झाला होता. यानंतर दोघे पती-पत्नी म्हणून भिवंडीतील नवी वस्ती भागात राहत असताना त्यांना तीन मुलेही झाली. काही महिन्यांनी आरोपी पतीचे त्याच भागात राहणाऱ्या समीनाशी प्रेमसंबंध निर्माण झाले.
पतीविरुद्ध गुन्हा दाखल:याप्रकरणी पीडित पत्नी तसेच तिच्या नातेवाईकांनी आरोपी पती आणि त्याच्या प्रेयसीला समजविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याने त्या दिवशीच पीडित पत्नीच्या कुटुंबासह प्रेयसी समोरच पत्नीला तिहेरी तलाक दिला. त्याने या प्रसंगाचे मोबाईलमध्ये चित्रीकरणसुद्धा केले. भिवंडी शहर पोलिसांनी पीडित पत्नीच्या तक्रारीवरून पतीविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळ केल्याच्या तसेच विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.
हेही वाचा:NCP Meeting Mumbai : मुंबईत राष्ट्रवादीचा मेळावा; निमंत्रण पत्रिकेत अजित पवारांचे नावच नाही, पुन्हा चर्चा सुरू