ठाणे- तिसऱ्यांदा १४ दिवसांचा लॉकडाऊन वाढविल्यानंतर भिवंडीतील परप्रांतीय कामगारांसाठी भिवंडी रोड रेल्वे स्थानक ते गोरखपूर अशा विशेष श्रमिक ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे कामगारांनी एकच गर्दी केल्याने गोरखपूरला जाणाऱ्या श्रमिक ट्रेनचे बुकिंग काही वेळातच फुल झाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभर लॉकडाऊनची तिसऱ्यांदा घोषणा करण्यात आली. यामुळे यंत्रमाग कामगारांसह रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आता १४ दिवसाचा लॉकडाऊन वाढल्यानंतर भिवंडीतील परप्रांतीय कामगारांसाठी भिवंडी रोड रेल्वे स्थानक ते गोरखपूर अशा विशेष श्रमिक ट्रेनची व्यवस्था करण्यात आली असून यासाठी पोलिसांनी नागरिकांच्या थांबण्यासाठी सोशल डिस्टनसिंगचे पालन करून चोख व्यवस्था केली होती. भोईवाडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मजुरांसाठी टावरे स्टेडियम, भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत मजूरांसाठी मानसरोवर, निजामपुरा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत मजूरांसाठी एसटी स्टँड, तर शांतीनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत मजुरांसाठी भादवड येथील संपदा नाईक हॉल येथे व्यवस्था करण्यात आली होती.