ठाणे -मुंबईप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले आहेत. सेामवारपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार होते, मात्र आता नवीन वर्षातच शाळा सुरू होण्याची शक्यता आहे.
दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे, त्यामुळेच खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यात ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, केडीएमसी, भिवंडी आणि उल्हासनगर या सहा महापालिका आणि अंबरनाथ, बदलापूर या नगरपालिकांचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक शाळा असून, विद्यार्थांची संख्या लाखोंच्या घरात आहे. ठाण्यात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत असून, शाळा बंद ठेवल्याने त्यावर नियंत्रण राहिल, असे शिंदे यांनी म्हटले आहे. शालेय शिक्षण विभागाने सोमवार, २३ नोव्हेंबरपासून राज्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने शाळांमध्ये साफसफाई फवारणी, शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात येत होती. मात्र दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली होती. त्यातच दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ हेाताना दिसत आहे. स्थानिक परिस्थिती बघून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात यावा असे शिक्षणमंत्र्यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत. त्यामुळे मुंबईच्या आयुक्तांनी ३१ डिसेंबरपर्यंत शाळा सुरू होणार नसल्याचे सांगितले, त्याबरोबरच आता ठाणे जिल्ह्यातील शाळाही बंद राहणार आहेत.
परिस्थिती पाहून निर्णय घेऊ