ठाणे - महापालिकेच्या ग्लोबल कोविड सेंटर येथे नव्याने एका ठेकेदाराला टेंडर देण्यात आले. या टेंडरवरुनच इतर ठेकेदार आणि पालिकेतील अधिकाऱ्यांकडून दबाव टाकण्यात आला आणि ठेकेदाराकडून टेंडर काढण्यात आले. या ठेकेदाराची तक्रार मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडे करण्यात आली होती. या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. अविनाश जाधव यांनी काल (सोमवारी) ठाणे पालिका आयुक्तांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ठाणे महानगरपालिकेचे कोविड सेंटरमधील कारभार हा नेहमीच गोंधळाचा राहिलेला आहे. कोविड रुग्णालयातून अनेक गैरप्रकारदेखील समोर आले आहेत.
अविनाश जाधव यांचा आरोप काय?
ठाणे मनपातील ग्लोबल आणि पार्किंग प्लाझा हे रुग्णालय सांभाळण्यासाठी हे टेंडर काढण्यात आले होते. यात तीन प्रकार होते. नॉरमल बेड, ऑक्सिजन बेड आणि आयसीयू बेड असे तीन प्रकार होते. आयसीयू बेडसाठी तीन कंपन्या आल्या होत्या. यात ऑल सर्व्हिसेस नावाच्या कंपनीने 2300 दर ठरवला. तर दुसरीकडे ओम कन्स्ट्रक्शनच्या खालिद शेख यांनी 4400 रुपये ठरवले. तर आणखी एका कंपनीने 5000 रुपये दर सांगितला असेल, असे त्यांनी सांगितले. मात्र, यानंतर टेंडर ऑल सर्व्हिसेसला हे टेंडर देण्यात आले. यानंतर त्याल्या सांगण्यात आले पुढच्या 10 दिवसांत तुम्ही आम्हाला साडेचार कर्मचारी द्यावेत. मात्र, सर्व्हे करण्यासाठी 8 दिवसांची मुदत द्यावी, त्यांनंतर आम्ही तुम्हाला कर्मचारी पुरवायला सुरुवात करू, अशी विनंती ऑल सर्व्हिसेसकडून करण्यात आली. यानंतर त्यांना सांगण्यात आले की, ठाणे मनपातील अतिरिक्त आयुक्त यांनी त्यांना सांगितले की, आमच्या टेंडरमध्ये एक अट अशी आहे की आम्ही हे टेंडर वाटून देऊ शकतो. मात्र, यासाठी ऑल सर्व्हिसेसकडून नकार देण्यात आला. याबाबत त्यांच्यावर ठाण्यातील एका नेत्याचा दबाव आहे, असा दावाही अविनाश जाधव यांनी केला.