ठाणे: केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या भिवंडी तालुक्यातील दिवे (अंजूर) ग्रामपंचायतीच्या सरपंचासह तिचा पती व एक ग्रामपंचायत सदस्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. याप्रकरणी तिघांवर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे; मात्र गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच तिन्ही आरोपी फरार झाले आहेत. सरपंच रेश्मा पाटील, पती सदानंद पाटील, ग्रामपंचायत सदस्य आकाश जनार्दन म्हात्रे, अशी गुन्हा दाखल झालेल्या लाचखोरांची नावे आहेत.
दीड लाखाच्या लाचेची मागणी:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार दापोड्यातील ए. के. अँड कंपनीत काम करीत आहे. दरम्यान ठेकेदार काम करत असलेल्या कंपनीच्या मालकीच्या दिवे (अंजुर) येथील जागेत मेसर्स आय. टच. पब्लिसिटी या कंपनीचे होर्डिंग लावण्याकरिता सरपंच रेश्मा पाटील यांनी २७ जुलै २०२३ रोजी तक्रारदाराकडे दीड लाखांची मागणी केली होती; परंतु पंचासमक्ष तडजोडी अंती २८ जुलै रोजी आकाश जनार्दन म्हात्रे या सदस्याने २५ हजार रुपये कमी करण्याचे सांगितले. त्यास सदानंद पाटील यांनी प्रोत्साहन दिल्याने १ लाख २५ हजार रुपये लाचेच्या स्वरूपात मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे लाचलुचपत विभागाने संबंधित तिघांवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ व १२ अन्वये नारपोली पोलीस ठाण्यात १० ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला. प्रकरणातील तिन्ही फरार लाचखोरांचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बल्लाळ यांनी दिली आहे.