ठाणे : Samruddhi Expressway : मुंबई ते नागपूर 'समृद्धी महामार्गा'चं शहापूर तालुक्यातील दळखण भागात काम सुरू आहे. या भागात काम करणाऱ्या एका कंपनीच्या मालकासह साईट इंचार्जनं ठेकेदाराला तब्बल १८ लाख ४५ हजार ४२० रुपयांचा चुना लावून फरार झाल्याची घटना (Samruddhi Expressway Work Fraud) समोर आलीय. याप्रकरणी फसवणूक झालेल्या ठेकेदारानं शहापूर पोलीस ठाण्यात समृद्धी महामार्गाचं काम करणाऱ्या आर्य मार्डन इफ्राप्रोजेक्स्टस प्रा. लिमिटेड कंपनीचे मालक राहुल भेगडे, साईट इंचार्ज नरेंद्र देशमुख या दोघांविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. राजेश घरत असं फसवणूक झालेल्या ठेकेदाराचं नाव आहे.
डंपर आणि पोकलेन लागणार असल्यानं तक्रारदाराला संपर्क : याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचं काम ७० टक्के झालंय. ठाणे जिल्ह्यात या महामार्गाचं काम सध्या सुरू आहे. ठाण्यात शहापूर तालुक्यातील दळखण भागातील या महामार्गाचं काम 'आर्य मार्डन इफ्राप्रोजेक्स्टस प्रा. लिमिटेड' कंपनीचे मालक राहुल भेगडे करत आहेत. त्यांच्या साईटवर इंचार्ज म्हणून नरेंद्र देशमुख काम पाहात होते. साईट इंचार्ज नरेंद्र देशमुख यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाला डंपर आणि पोकलेन लागणार असल्यानं तक्रारदार ठेकेदार राजेश घरत यांना २०२१ साली ऑकटोबरमध्ये संपर्क साधला. त्यानंतर कंपनी मालक भेगडे यांच्यांशी संपर्क साधून घरत यांना समृद्धी महामार्गाच्या कामासाठी भाड्याची रक्कम नक्की करून काही डंपर आणि पोकलेन दळखण भागातील खर्डी येथे देण्यात आले होते.