ठाणे - लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सर्वात पहिल्यांदा सलून दुकाने बंद झाली; आणि यामुळे नाभिक समाजावर संकट ओढावले. यामुळे आज नाभिक समाजाने उल्हासनगर महानगरपालिकेवर धडक दिली. सलूनची दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, तसेच दुकानदारांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत नाभिक संघटनेतर्फे पालिका आयुक्त समीर उन्हाळे यांना निवेदन देण्यात आले.
सलून सुरू करण्याच्या मागणीसाठी नाभिक समाजाची पालिकेवर धडक - lock down in thane
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सर्वात पहिल्यांदा सलून दुकाने बंद झाली; आणि यामुळे नाभिक समाजावर संकट ओढावले. यामुळे आज नाभिक समाजाने उल्हासनगर महानगरपालिकेवर धडक दिली. यावेळी त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन पालिका आयुक्तांना दिले आहे.
उल्हासनगर शहरात जवळपास सर्वच दुकाने सुरू झाली असून रस्त्यांवर तसेच बाजारपेठेत ग्राहकांची रेलचेल सुरू झालेली आहे. मात्र शहरातील सलून व्यवसाय अद्याप ठप्प आहे. शासनाने अद्याप सलून व्यवसाय सुरू करण्याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाहीय. त्यामुळे केशकर्तनालयांच्या भविष्याबाबत संदिग्धता कायम आहे. सलून आणि पार्लर सुरू करण्याबाबत लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर अवलंबून असल्याने उपासमारीची वेळ आल्याचे सरकारने आर्थिक मदत देण्याची मागणी देखील करण्यात आली.
सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून व्यवसाय पुन्हा सुरू करू, अशी ग्वाही शिष्टमंडळाने समीर उन्हाळे यांना दिली. यावेळी नाभिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अरुण जाधव, शहराध्यक्ष भारत राऊत, ठाणे जिल्हाध्यक्ष सुशील पवार, सुनंदा आमोदकर, प्रतिभा कालेकर आदी उपस्थित होते.