ठाणे - मायबाप सरकार दीड वर्षापूर्वी नुकसान झालेल्या भातपिकाची भरपाई तहसीलदाराने अद्यापही दिली नाही. मग यंदाच्या परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईचा मदत निधी काय मिळणार? असा टाहो शेतकऱ्यांनी कृषी राज्यमंत्र्यांसमोर भरसभेत फोडला. विशेष म्हणजे दीड वर्षापासून शासनाकडून शेतकऱ्यांसाठी आलेला मदत निधी तहसील कार्यालयात पडून आहे. मात्र, त्याचे स्थानिक प्रशासनाने वाटप केले नाही. मग आता तरी मदत निधी वेळेवर मिळेल का ? असा सवाल विचारत भिवंडी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासमोरच भिवंडीचे तहसीलदार शशिकांत गायकवाड यांच्या कामचुकारपणाचा बुरखा फाडला.
निसर्गाच्या अवकृपेत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासकीय आर्थिक मदत मिळावी, यासाठी राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत भातपिकांच्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी भिवंडी तालुक्यात आले होते. यावेळी पाहणी दौरा आटपून नव्याने उभारण्यात आलेल्या भात खरेदी केंद्रात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, शिवसेना ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, तहसीलदार शशिकांत गायकवाड, तालुका कृषी अधिकारी गणेश कांबळे, गटविकास अधिकारी प्रदीप घोरपडे उपस्थित होते.
हेही वाचा -भिवंडीत माजी नगरसेवकाच्या अवैध संपर्क कार्यालयावर पालिकेने फिरवला बुलडोजर