नवी मुंबई -पंतप्रधान आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. कामोठे खांदेश्वरसारख्या नियोजनबद्ध शहराच्या विकास आराखड्यात बदल करून पंतप्रधान आवास योजना उभी केली जात आहे. या प्रकल्पाला नागरिक कडाडून विरोध करत आहेत.
खांदेश्वर रेल्वे स्थानक आणि मानसरोवर (कामोठे) रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळ असलेल्या भूखंडावर सिडकोचे पूर्व नियोजन बदलून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे बांधण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी या प्रकल्पाचा पाहणी दौरा केला. या प्रकल्पाविरोधात परिसरातील नागरिक एकवटले आहेत. नागरी हक्क समितीची स्थापना करून सिडकोच्या विरोधात लढा उभारणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.
पंतप्रधान आवास योजनेसाठी सिडकोच्या माध्यमातून कामोठे, खांदेश्वर, खांदा कॉलनी, रोडपाली या ठिकाणी घरे बांधण्यात येणार आहेत. कामोठे व खांदेश्वर रेल्वे स्थानकाला अगदी खेटून असलेल्या या प्रकल्पाला सुरुवात झाल्यानंतर नागरिकांकडून प्रचंड विरोध झाला आहे. पर्यावरण विभागाची परवानगी मिळण्यापूर्वीच प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. नागरिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या आहेत. तसेच या प्रकल्पाविरोधात मोर्चे काढून आंदोलनही केली आहेत. या स्थानिक नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन स्थानिक काँग्रेस नेत्यांनी केलेल्या मागणीनुसार सचिन सावंत यांनी गुरुवारी प्रकल्पस्थळांची पाहणी केली. नियोजनबद्ध पद्धतीने उभ्या केलेल्या शहरात जागांचे आरक्षण बदलण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचे मत जाणून घेण्याची कोणतीही प्रक्रिया राबविली नाही. पर्यावरण विभागाची परवानगी मिळण्यापूर्वीच चार कंत्राटदारांना चार ठिकाणांच्या प्रकल्पांची कंत्राटे दिली असल्याचा आरोप त्यांनी केला.
खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोर असलेला प्रकल्प भविष्यात अत्यंत अडचणीचा ठरणार आहे. रेल्वे स्थानक आणि आवास योजनेची इमारत यांच्यामध्ये असलेला रस्ता अत्यंत अरुंद आहे. याचा विचार सिडकोने का केला नाही? असा प्रश्नही सावंत यांनी उपस्थित केला. तसेच सिडकोच्या अधिकारी वर्गाशी त्यांनी संपर्क केला असता, सिडकोचे अधिकारी हा प्रकल्प होणार, यावर ठाम असल्यामुळे सावंत यांनी थेट नगरविकास मंत्रालयाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला. प्रकल्पस्थळांची पाहणी केल्यानंतर सचिन सावंत यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला.