ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच मुंब्रा पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड ( Ruta Awhad ) यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून शिंदे- फडणवीस सरकारला तोडीसतोड उत्तर देण्याचा इशारा दिला. राजकीय सूडापोटी आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे ते यावेळी म्हणाल्या.
न्यायलयीन लढाई लढणार - केवळ 72 तासात सदर गुन्हा दाखल होतोच कसा असेही ऋता आव्हाड म्हणाल्या. आम्ही आता न्यायालयीन लढाई लढणार असून त्यात जर पोलिसही दोषी आढळले तर त्यांचीही गय केली जाणार नाही. भाजपाला मुंब्रा मतदार संघात त्यांचा आमदार निवडून आणायचा आहे, त्यामुळेच हा सगळा खटाटोप सुरु असल्याचे ऋता यांनी म्हटले.
जितेंद्र आव्हाड यांच्यावरील विनयभंगाच्या गुन्ह्याविरोधात पत्नी ऋता आव्हाड माध्यमांसोबत प्रतिक्रिया व्यक्त करताना हा कसला विनयभंग ?ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे, त्यांच्याकडे मोटीव्ह आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीत पीडीत महिला यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्या जामिनावर आहेत तसेच राष्ट्रवादी व आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बोलल्या प्रकरणी हे गुन्हे पीडित महिले विरोधात दाखल असल्याचे त्यांनी सांगितले. अंगावर धडकणाऱ्या व्यक्तिला बाजूला करणे गुन्हा असेल तर बाजारात, ट्रेनमध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकडोंनी ‘विनयभंग’ होत असतील, असेही ऋता यांनी म्हटले आहे. पीडित महिला राजकारणी महत्वाकांक्षा बाळगत असून काल रात्री त्या कुणाला तरी भेटल्या. त्यांच्यावर पण अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. जे काही घडलं ती स्पॉनटेनियस रिअॅक्शन होती. त्याला विनयभंग म्हणतां येत नाही, असे म्हणत ऋता यांनी त्यांच्या पतीची बाजू मांडली आहे.
आव्हाडांच्या समर्थकांचे आंदोलन - आज मुंब्र्यात ठिकठिकाणी आंदोलन करत आंदोलकांनी आव्हाडांविरोधातील गुन्हा आणि कारवाईचा विरोध केला. मुंब्रा बायपास परिसरातील पनवेल ठाणे महामार्गावरील दोन्ही लेनवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकत रस्ता रोखण्याचा प्रयत्नही आंदोलकांनी केला. मात्र त्वरित हा कचरा हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान मुंब्रा पोलीस ठाणे परिसरातील धरणे आंदोलनात राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते आणि आव्हाड समर्थक उपस्थित होते. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत या आंदोलकांनी मुंब्रा पोलीस ठाणे परिसर दणाणून सोडला. यावेळी मुंब्रा पोलीस ठाण्याला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले होते.