ठाणे : प्रवाशांच्या तक्रारी ऐकण्यासाठी बोगीत गेलेल्या आरपीएफ जवानाचा चालत्या रेल्वेमधून उतरताना (RPF Jawan Kasara Railway Station) तोल गेल्याने, रेल्वेच्या आणि फलाटाच्या गॅपमध्ये येऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना मध्य रेल्वेच्या (RPF Jawan Death) कसारा रेल्वे स्थानकात घडली आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपघाताची (Kasara Railway Station Thane) नोंद करण्यात आली आहे. तर रेल्वे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
प्रवाशांनी बोगीमधून मदतीसाठी मारली हाक : मृत दिलीप सोनवणे हे कल्याण परिसरात परिवारासह राहत होते. ते मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकात जवान म्हणून कार्यरत होते. त्यातच मृत दिलीप सोनवणे हे शनिवारी रात्रपाळीच्या कसारा रेल्वे स्थनाकात ड्युटीवर होते. रविवारी सकाळी सातच्या सुमारास एलटीटी-कानपूर एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी बोगीमधून त्यांना मदतीसाठी हाक मारली. त्यावेळी फलाटावर उभे असलेले सोनावणे हे तक्रारीचे निवारण करण्यासाठी रेल्वेच्या बोगीत चढले होते. त्यानंतर एक्स्प्रेस सुरू झाल्याने रेल्वेमधून उतरताना आरपीएफ जवानाचा तोल सुटला आणि फलाटाच्या आणि रेल्वेच्या मध्ये असलेल्या गॅपमध्ये पडल्याने दिलीप सोनवणे जागीच ठार झाले.