ठाणे- एका वकिलाच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा पडल्याची घटना ( Robbery in Advocate House ) समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दरोडेखोरांनी बंगल्यातील वृद्ध महिलेच्या गळ्यावर सुरा ठेवत अंगावरीलही दागिन्यांची लूट केली आहे. ही घटना भिवंडी शहरालगत असलेल्या खोणी गावात घडली आहे. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात ( Nijampur Police Station ) 5 अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
कार्यलयानंतर बंगल्यात दरोडा -अॅड. अजय विष्णू पाटील हे कुटूंबासह खोणी गावातील बंगल्यात राहतात. दरोडा पडला त्यावेळी अॅड. अजय हे आपल्या पत्नी मुलासह एका खोलीत तर त्यांची आई नंदा व सहा वर्षांची मुलगी ही दुसऱ्या खोलीत झोपल्या होत्या. त्यातच आज (दि. 2 मार्च) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आलेल्या दरोडेखोरांनी प्रथम अजय पाटील यांच्या कार्यालयाची कडी कोयंडा तोडून कार्यालयात प्रवेश केला. मात्र, कार्यलयात काही मिळून न आल्याने दरोडेखोरांनी आपला मोर्चा पहिल्या मजल्यावरील घरात वळवला. तेथीलही दरवाजाच्या आतील कडी कशाच्यातरी साहायाने उचकटून नंदा पाटील झोपलेल्या खोलीत ते शिरले व त्यांच्या गळ्यावर सुरा ठेवत कानातील कर्णफुले खेचून काढली. इतक्यावरच न थांबता चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील गंठन व हातातील बांगड्या हिसकावून घेतल्या.