ठाणे : डोंबिवलीत रिक्षा चालकांची दादागिरी वाढली असून, वाढलेल्या प्रवाशी भाड्या संदर्भात जाब विचारणाऱ्या प्रवाशाला मुजोर रिक्षाचालकाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना डोंबीवली पूर्वेकडील इंदिरा चौकात घडली असून मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तर याप्रकरणी जखमी प्रवाशाने रामनगर पोलीस ठाण्यात त्या मुजोर रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गणेश तांबे असे मारहाण झालेल्या प्रवाशाचे नाव आहे.
प्रवाशी भाड्यावरून वाद : डोंबिवली हे चाकरमान्यांचे शहर आहे. त्यामुळे येथे कायमच रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर चाकरमानी घरी जाण्यासाठी रिक्षांचा वापर करत असतात. त्यातच कल्याण पूर्व भागात राहणारे गणेश तांबे हे काल (सोमवारी) रात्री साडे अकरा वाजता कामकाज आटपून नेहमीप्रमाणे डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात जाऊन टाटा पॉवर पर्यंत शेअर रिक्षेने जाण्याचे ठरविले. गणेश हे रिक्षापर्यंत गेल्यानंतर भाडे किती घेणार असा प्रश्न रिक्षा चालकाला त्यांनी विचारला. त्यावेळी रिक्षा चालकाने चाळीस रुपये भाडे वाढवून सांगितल्याने त्यांनी इतके भाडे होत नाही. असे सामंजस्य पणे त्यांनी रिक्षा चालकाला सांगण्याचा प्रयत्न केला.