ठाणे -१३ वर्षीय मुलगा घरी जाण्यासाठी रिक्षात बसला असता रिक्षाचालकाने त्याचे अपहरण करून त्याच्या गळ्यातील सोनसाखळी लुटल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवली पश्चिम भागात समोर आला होता. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला असता ४८ तासातच तांत्रिक बाबीसह सीसीटीव्ही फुटेज व अपहरण झालेल्या मुलाने दिलेल्या वर्णनावरून रिक्षाचालकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. सम्राट अनंत मगरे ( वय, १९ रा. सिद्धार्थ नगर, डोंबिवली पश्चिम ) असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचं नाव आहे.
असा घडला लुटमारीचा प्रकार -मोहन बाळाराम भोईर, (वय ३८) हे डोंबिवली पश्चिम भागातील देवी चौक परिसरात कुटूंबासह राहतात. त्यांना १३ वर्षीय साई नावाचा मुलगा असून तो तबला वादनाच्या प्रशिक्षणासाठी भागाशाळा मैदानजवळ एका क्लासमध्ये जात असतो. त्यातच १८ मे रोजी तबला वादनाच्या प्रशिक्षण आटपून रात्री ८ वाजताच्या सुमाराला घरी जाण्यासाठी रिक्षात बसला. त्यानंतर रिक्षाचालकाला देवी चौक येथे घरी जाण्याबाबत सांगताच त्याने रिक्षा घराच्या दिशेने न जाता चुकीच्या दिशेने वळविली, त्यामुळे साईने विचारणा केली असता त्याने त्याच्या मित्राला सोबत घ्यावयाचे असल्याचे सांगीतले. त्यानंतर मात्र निर्जनस्थळ असलेल्या बावनचाळ येथील रेल्वे मैदान रिक्षा थांबविली व त्याच्या गळयातील सोन्याची चैन काढून घेतली. त्यानंतर रिक्षा घराच्या दिशेने घेऊन जात असताना त्याच्या आईचा मोबाईलवर कॉल आला असता साईने सांगितले कि रिक्षाचालक विनाकारण फिरवत असून त्याने गळयातील सोन्याची चैनही काढून घेतली. हे सांगताच रिक्षाचालाकने साईच्या हातातील मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे साईने रिक्षातून उडी मारुन घरच्या दिशेने पळ काढून कसा तरी घरी पोहचला.