ठाणे- महापालिकेच्या व्हीआयपी प्रवेशद्वारातून कंबरेला रिव्हॉल्वर लटकवून एक आगंतुक व्यक्ती थेट महापालिकेत शिरल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. त्यानंतर हा रिव्हॉल्वरधारी व्यक्ती बराच वेळ महापौर व इतर बड्या पदाधिकाऱ्यांची कार्यालये असलेल्या पहिल्या मजल्यावर रिव्हॉल्वरचे प्रदर्शन करीत फिरतांना असल्याचे दिसून आले. त्यामुळे महापालिकेची सुरक्षाव्यवस्था ढिसाळ झाल्याचा प्रत्यय आला आहे.
ठाणे महापालिकेचे मुख्यालय पाचपाखाडी येथे आहे. पालिका मुख्यालयात आंतरबाह्य सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित आहे. तर, महापालिकेची सुरक्षाव्यवस्था पाहण्यासाठी मुख्य सुरक्षा अधिकारी मछिंद्र थोरवे यांच्या नियंत्रणाखाली सद्यस्थितीत एकूण 1130 सुरक्षारक्षक तैनात आहेत. थोरवे हे निवृत्त पोलीस अधिकारी असल्याने त्यांचा पालिकेच्या प्रत्येक घडामोडींवर पहारा असतो. असे असतानाही गुरुवारी वर्षा मॅरेथॉनची महत्वाची बैठक महापौरांच्या कार्यालयात सुरू होती. यावेळी एक व्यक्ती या कार्यालयाबाहेरील व्हरांड्यात चक्क कंबरेला रिव्हॉल्वर लावून येरझाऱ्या घालीत असल्याचे दिसून आले.