मीरा -भाईंदर (ठाणे)राज्याचे नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आज मीरा भाईंदर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शहरातील विविध कोविड सेंटरची पाहणी केली, तसेच पालिका मुख्यालयात आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक देखील घेतली.
पालकमंत्र्यांकडून कोरोनाचा आढावा
मीरा भाईंदर शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे, मात्र शहरात बेड ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याचं दिसून येत आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. पालकमंत्र्यांनी आपल्या या दौऱ्यामध्ये सर्व प्रथम पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी शहरातील परिस्थितीबाबत जाणून घेतले. त्यानंतर शिंदे यांनी आमदार गीता जैन यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला भेट दिली. दुपारी १२.३० च्या सुमारास अप्पासाहेब धर्माधिकारी कोविड सेंटरची पाहणी करत, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांशी सवांद साधला. त्यानंतर भाईंदर पश्चिमेला नव्याने सुरू होत असलेल्या उत्तन कोवीड सेंटरच उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पालिका मुख्यालयातील कोविड वॉर रूमला देखील भेट दिली.
तपोवन कोविड सेंटरवरून सेना - भाजपाचे राजकारण
जैन समाजाच्या वतीने शहरातील कोरोना रुगणांसाठी स्वखर्चाने भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक परिसरातील तपोवन शाळेत कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरच उद्घाटन भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दुसऱ्यांदा पुन्हा फीत कापून उद्घाटन पार पडले. त्यामुळे पुन्हा एकदा मीरा भाईंदर शहरात श्रेय घेण्यासाठी सेना, भाजप पुढे आल्याचे दिसून आले. कोरोना महामारीच्या काळात राजकारण करणे योग्य नसून, सर्वांनी मिळून कोरोनाची लढाई लढावी असे आवाहन समाजसेवक सुयोग बोरकर यांनी केले आहे.
पालकमंत्र्यांकडून मीरा-भाईंदरमधील कोरोना परिस्थितीचा आढावा पालकमंत्र्यांकडून महापालिकेला सूचना
मीरा- भाईंदर शहराच्या दौऱ्यावर असताना पालकमंत्री यांनी संपूर्ण शहराचा आढावा घेत, पालिका प्रशासनासोबत बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी मृत्युदर शून्यावर आणा आणि रिकव्हरी रेट वाढवा असे आदेश दिले. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरीही, कोरोनामुक्तांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. वाढत्या रुग्णांची संख्या पाहता ऑक्सिजन प्रकल्पात वाढ व्हायला हवी, त्यासाठी राज्य सरकारकडून सहकार्य मिळेल, असे आश्वासन शिंदे यांनी या बैठकीत दिले. कोरोना लसीकरण मोहीम जलद गतीने होण्यासाठी आवश्यक त्या सूचनाही शिंदे यांनी यावेळी दिल्या.
हेही वाचा -सीबीआयकडून चौकशीचा अहवाल विशेष न्यायालयात सादर