ठाणे- कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातून अन्यत्र अत्यावश्यक सेवेसाठी जाणऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची यापुढे मुंबईतील त्या-त्या अस्थापना नजीक असलेल्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली जाणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी ही माहिती दिली आहे. महापालिका हद्दीत कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्यामागे कल्याण-डोंबिवली क्षेत्रातून मुंबईतील अत्यावश्यक सेवेत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्या अधिकारी कर्मचाऱ्यांची मुंबईतच राहण्याची सोय करावी, अशी मागणी गेल्या काही दिवसापासून विविध पक्षातील लोकप्रतिनिधी करत होते.
कल्याण-डोंबिवलीतून अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रतिबंध - लॉकडाऊन 3
महापालिका हद्दीत कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्यामागे कल्याण-डोंबिवली क्षेत्रातून मुंबईतील अत्यावश्यक सेवेत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्या अधिकारी कर्मचाऱ्यांची मुंबईतच राहण्याची सोय करावी, अशी मागणी गेल्या काही दिवसापासून विविध पक्षातील लोकप्रतिनिधी करीत आहेत.
त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कोरोना रुग्णांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी मुंबईतील विविध विभागाशी संपर्क करून त्यांच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणून दिली. त्यानंतर 8 मे पासून महापालिका क्षेत्रात मुंबईला नोकरी निमित्त अधिकारी आणि कर्मचाऱ्याला जाता येणार नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तर महापालिका क्षेत्रातून शासकीय आणि खासगी सेवेसाठी कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्राबाहेर नोकरीसाठी प्रतीदिन मुंबईकडे ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहीती संकलन करण्याची पालिका स्तरावरून प्रक्रिया सुरू झाली आहे.
खळबळजनक बाब म्हणजे आजपर्यंत महापालिका हद्दीत 224 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 73 रुग्ण हे मुंबईतील विविध विभागातील कर्मचारी आहेत. त्यांच्या निकट सहवासात असलेले 28 रुग्ण असल्याची माहितीही महापालिका आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांनी दिली आहे. दरम्यान, आज नव्याने 11 कोरोनाबाधित रुग्ण महापालिका हद्दीत आढळून आले. यापैकी 6 रुग्ण हे मुंबईतील अत्यावश्यक सेवेत असलेले कर्मचारी आहेत. तर 2 रुग्ण नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केट मधील कर्मचारी आहेत. तसेच 2 रुग्ण कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील आहेत. तर 1 रुग्ण कल्याणातील खासगी शिकवणी वर्गाचा कर्मचारी आहे. आज दिवसभरात 6 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 224 रुग्णांपैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. सध्याच्या स्थितीत 147 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत 74 रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.