ठाणे- सतत दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या नाल्यांना पूर आला होता. या पुरामुळे हजारो नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर मुक्या प्राण्यांनाही पुराचा फटका बसला आहे. पुराच्या पाण्यात शेकडो प्राणी मृत्यूमुखी पडले तर काही जिवाच्या भीतीने मिळेल तिथे आसरा घेत होते. यावेळी पुरापासून बचावासाठी तीन सापांनी नागरीवस्तीत आसरा घेतला आहे. यामध्ये मांडूळ जातीच्या सापाने झाडावर, घोणसने दुकानात तर डुरक्या घोणसने शौचालयात आश्रय घेतल्याचे आढळले.
पुराच्या पाण्याने सापांचा नागरीवस्तीत आश्रय; ३ साप पकडले - Saparde
पुरापासून बचावासाठी तीन सापांपैकी मांडूळ जातीच्या सापाने झाडावर, घोणसने दुकानात तर डुरक्या घोणसने शौचालयात आश्रय घेतल्याचे आढळले.
शहाड परिसरातील अनेक भागात पुराचे पाणी शिरले होते. याच पुराच्या पाण्यातून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी लांबलचक विषारी घोणस दुकानात शिरली होती. हा साप दुकानात शिरताना कामगाराला दिसला त्यामुळे त्यानी सगळ्यांना सावध केले व दुकानात जाण्यास मनाई केली. मात्र, दुकानातून पुराचे पाणी ओसरल्यानंतर प्रितम कदम यांनी वार संस्थेचे सर्पमित्र हितेश यांना पाचारण केले. सर्पमित्र हितेशने घोणसला दुकानाच्या कपाटा मागून शिताफीने पकडले. त्यानंतरच दुकान मालकासह कामगारांनी सुटकेचा निश्वास घेतला.
दुसऱ्या घटनेत सापर्डे गावातील बैठ्या चाळीतल्या एका घरातील सौचालयाच्या भांड्यात डुरक्या घोणस हा बिनविषारी साप दडून बसला होता. या सापालाही हितेशने पकडून पिशवीत बंद केले. तिसऱ्या घटनेत एक मांडूळ जातीचा लांबलचक साप, दुर्गाडी किल्ल्याच्या नजीक असलेल्या वाहतूक विभागाच्या पोलीस चौकी मागे असलेल्या एका झाडावर आढळून आला होता. हा साप खाडीच्या पुरात वाहून जात असताना त्याने या झाडावर जीव वाचविण्यासाठी आश्रय घेतला होता. सापाला झाडावरून काढण्यासाठी वाहतूक पोलीस चौकीचे पोलीस हवलदार एस.आर.भोये यांनी सर्पमित्र हितेशला संपर्क केले. माहिती मिळताच सर्पमित्राने घटनास्थळी दाखल होऊन या सापाला झाडावरून सुखरूप खाली आणले. दरम्यान, या तिन्ही सापांना वन अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन निसर्गाच्या सानिध्यात आज सोडणार असल्याची माहिती सर्पमित्र हितेश यांनी दिली आहे.