नवी मुंबई -पनवेल शहरातील कोळीवाड्यालगत असणाऱ्या प्रसिद्ध मासळी बाजाराचे स्थलांतरण करण्याबाबतचा उल्लेख पनवेलच्या पालिका आयुक्तांनी एका मुलाखतीत केला होता. लवकरच हा बाजार पनवेल-उरण व नवी मुंबई शहरातील मध्यवर्ती ठिकाणी हलवला जाणार असून तो स्वच्छ व एका भव्य इमारतीमध्ये असेल, असे पनवेलचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर पनवेल कोळी वाड्यातील कोळी बांधव आक्रमक झाले आहे. तसेच, या स्थलांतरास शेतकरी कामगार पक्ष व कोळी बांधवांनी विरोध दर्शविला आहे.
पनवेल कोळीवाड्यातील मासळी बाजाराचे लवकरच स्थलांतरण? पालिकेच्या हालचालींना अनेकांचा विरोध पनवेल शहरातील मासळी बाजार हा 'उरण नाका' या नावाने प्रसिद्ध आहे. उरण पनवेल नवी मुंबई व इतरत्र ठिकाणावरील नागरिक मासळी खरेदीसाठी येथे येतात. परंतु वाहन तळाचा अभाव, बेशिस्त वाहने आणि उघड्यावरील मासे विक्रीमुळे प्रसिद्ध मासळी बाजाराला ग्रहण लागले आहे. तसेच, येथील अनेक रहिवाशांनी दुर्गंधी व वाहतूक कोंडीच्या अनेक तक्रारी पोलीस व पालिकेकडे केल्या आहेत. पालिका प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अनेकदा समज देऊनही मासेविक्रेते मासळी बाजारची ओटी सोडून मासे विक्री करण्याकरिता मोकळ्या जागेत तर कधी थेट रस्त्यावर येत आहेत. यामुळे पालिकेने येथे मासळी बाजाराच्या इमारत उभारणीसाठी सिडको महामंडळाकडे जागेची मागणी केली होती. ही जागा पनवेल शहर कळंबोली खांदेश्वर आणि कामोठे वसाहतीचे केंद्र असून संबंधित जागेपासून उरण ते नवी मुंबईची दळणवळण सोयीचे होईल, अशा जागेची चाचपणी सुरू असल्याची माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली आहे.
हेही वाचा -लॉकडाऊनमध्ये इंजनिअरची गेली नोकरी : चहाचे दुकान टाकून जीवनात आणला गोडवा
हा निर्णय आम्हा कोळी बांधवांना माहिती नव्हता - स्थानिक कोळी बांधव
पनवेलच्या कोळीवाड्यातील 99% कुटुंबांचा मासळी विक्री हाच व्यवसाय आहे. त्यामुळे मासळीबाजार स्थलांतरित झाल्यास अनेकांच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची भीती येथील स्थानिक कोळीबांधव व्यक्त करत आहेत. यापूर्वी सव्वा कोटी रूपये खर्च करून पालिकेने हा बाजार बांधला होता. त्यावेळी स्वच्छतेच्या सुविधा आहे तेथे विक्रेत्यांना मिळतील, शीतगृहाची उभारणी व इतर सोयी मिळतील अशी घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही, असे स्थानिक कोळी बांधव सांगत आहेत.
'कोळीवाड्यातील मासळीबाजारातचे स्थलांतर करण्याचा हा निर्णय आम्हा कोळी बांधवांना माहिती नव्हता. लवकर त्या बाबतीत आम्ही बैठका घेऊन आमची भूमिका ठरवू. या ठिकाणी सुमारे चार पिढ्यांची परंपरा सांगणारा मासळी बाजार स्थलांतरित झाल्यास या सर्वांचे संसार रस्त्यावर येतील, असे कोळीवाडा पंच कमिटी सदस्य सांगत आहेत.
पनवेलचा हा मासळी बाजार पिढ्यानपिढ्या येथे वसलेला आहे आणि आताच हा बाजार स्थलांतरित करण्याचा डाव आम्ही हाणून पाडू. याचा शेतकरी कामगार पक्ष जोरदार विरोध करत असून पालिकेने घेतलेला निर्णय मागे घ्यावा. अन्यथा, आम्ही आंदोलन करून याचा निषेध करू,' असा इशारा पनवेलचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी दिला आहे.
आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले स्पष्ट
पनवेलच्या मासळी बाजारात उरण आणि पनवेल येथे मासेमारी केलेले मासे उपलब्ध होतात. संपूर्ण महाराष्ट्रात येथून मासळी जाते. त्यामुळे मासळी बाजार उठवला जाणार हे वाक्य थोडे 'उद्रेकी' वाटत आहे, असे पनवेल चे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी म्हटले आहे. आत्ता जो मासळी बाजार आहे, त्यासाठी मोठी आणि आवश्यक सोयी-सुविधांनी युक्त जागा हवी असेल तर, यासाठी आणखी मासळी बाजार करावे लागतात की काय, यावर लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल.
कोरोनाच्या काळात उरण नाक्यावर मासळी खरेदीसाठी खूप मोठी गर्दी होते, अशा बऱ्याच लोकांच्या तक्रारी होत्या. याबाबतीत सर्वांनी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. पूर्वी शहराचे क्षेत्रफळ 12 चौरस किलोमीटर होते. नगरपालिकेच्या नियंत्रणाखाली 3.63 इतका भाग होता. त्यामुळे नियोजनाला अडचणी होत्या. महापालिका क्षेत्रात शहर 110 चौरस किलोमीटरचे आहे. त्यामुळे स्थानिक लोकांसाठी वेगवेगळ्या बाजारपेठा व्हाव्यात. तसेच, हा मासळी बाजारही चांगला व्हावा व त्यापासून तक्रारी, घाणीचे साम्राज्य आणि वाहतूक कोंडी होणार नाही, याप्रकारे नियोजन करण्यात येईल. तसेच, व्यावसायिकांना चांगले वातावरण मिळेल, तसेच शहरात वेगवेगळे बाजार करणे म्हणजे आहे तो बाजार काढला जाणे, असा याचा अर्थ होत नाही, असे आयुक्त सुधाकर देखमुख यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा -बळीराजा म्हणतो... कोरोना महामारीने जगायला शिकवले