नवी मुंबई - कृषी उत्पन्न बाजार समितीत आज (गुरूवारी) कोकणातून आंब्यांची विक्रमी आवक झाली. मात्र, 'कोरोना'मुळे आंब्याच्या निर्यातीवर चांगलाच परिणाम झाला आहे. यामुळे व्यापारी वर्गात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तर जास्तीत जास्त फळांचा उपयोग खाण्यासाठी करावा असेही आवाहन ग्राहकांना व्यापारी वर्गातून केले जात आहे.
आज (गुरूवारी) मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्याची विक्रमी आवक झाली आहे. 2020 मधील ही विक्रमी आवक असल्याचे व्यापारी वर्गातून सांगितले जात आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तिन्ही जिल्हे मिळून 4 हजार आंबा पेट्यांची आवक बाजारात झाली आहे. 2 हजार ते 6 हजार रुपयांपर्यंत मालाच्या पेट्यांची विक्री बाजारात झाली आहे. चांगल्या प्रतीच्या आंब्यांची पाच डझनची पेटी ही सहा ते साडे सहा हजार रुपयांनी विकली गेली आहे. तर छोटी पेटी ही दोन ते अडीच हजार रुपयांनी विकली गेली आहे. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आंब्यांच्या निर्यातीवर चांगलाच परिणाम झाला आहे.