नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या युवक जिल्हाध्यक्षावर खंडणीचा गुन्हा.. व्यावसायिकाकडे महिना 50 हजाराची मागणी - नवी मुंबई बातमी
नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष किशोर उर्फ अन्नू आंग्रेसह त्याच्या 6 साथीदारांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे खंडणी मागताना अन्नू व त्याचे साथीदार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. एका उच्चशिक्षित बेरोजगार तरुणाने नव्याने व्यवसाय सुरु केला आहे. हा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी महिना ५० हजार रुपये हप्त्याची मागणी अन्नू व त्याच्या साथीदारांनी केली होती.
नवी मुंबई -नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष किशोर उर्फ अन्नू आंग्रेसह त्याच्या 6 साथीदारांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे खंडणी मागताना अन्नू व त्याचे साथीदार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. एका उच्चशिक्षित बेरोजगार तरुणाने नव्याने व्यवसाय सुरु केला आहे. हा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी महिना ५० हजार रुपये हप्त्याची मागणी अन्नू व त्याच्या साथीदारांनी केली होती. हप्ता न दिल्यास ठार मारण्याची धमकीही त्या उच्चशिक्षित तरुणाला दिली होती.
व्हिडिओ गेम पार्लर सुरू ठेवण्यासाठी मागितली खंडणी -
दिघा येथील महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये पवन मेलगडे या तरूणाने मित्राच्या मदतीने व्हिडिओ गेम पार्लर सुरु केले आहे. पवन याने कम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले आहे. सध्या तो बेरोजगार असून उत्पन्नाचे साधन नसल्याने उत्पन्न मिळवण्यासाठी पवनने व्यवसाय सुरु केला आहे. शुक्रवारी रात्री तो मित्रासह त्याच्या गेम पार्लरमध्ये असताना त्याच परिसरातील राहुल आंग्रे हा काही साथीदारांसह त्याठिकाणी आला. तुला जर धंदा सुरु ठेवायचा असेल तर अन्नू भाईला भेटावे लागेल असे सांगितले. परंतु पवन याने अन्नू भाई कोण? असे विचारताच राहुल व त्याच्या साथीदारांनी पवनला मारहाण केली.