ठाणे - खंडणी उकळल्याप्रकरणी भिवंडी शहरातील विविध पोलीस ठाण्यांत आधीच गुन्हे दाखल असलेल्या एमआयएम शहराध्यक्ष खालिद गुड्डू याच्याविरोधात आता भिवंडी शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा तर, निजामपुरा पोलीस ठाण्यात खंडणीचा पाचवा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे खंडणी प्रकरणाचा सूत्रधार असलेल्या खालिद गुड्डू याच्यावर मोठी कारवाई अटळ आहे.
भिवंडीतील अवचित पाडा येथील कलिम अहमद मोहम्मद मोबिन अन्सारी याने आपल्या सर्व्हे क्रमांक ४७, सिटी सर्व्हे क्रमांक ४३६४ या जागेवर इमारत उभारणीचे काम सुरू केले असता आरोपी खालिद गुड्डू याचे साथीदार अब्दुल्ला अब्दुल लतीफ सय्यद आणि हमीद शेख यांनी इमारत बांधकामाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून केली होती. तसेच अन्सारी यांना इमारत पडण्याची कारवाईची भीती दाखवत बरे-वाईट करण्याचीही धमकी दिली आणि कारवाई टाळायची असेल तर पुनर्विचार याचिका मागे घेण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. अन्सारी यांनी पाच रुपयांची खंडणी दिली. याबद्दल अन्सारी यांनी निजामपूरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.