ठाणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक कामे केल्याने त्यांचा फोटो असलेली राखी मोफत देण्याचा उपक्रम 'मामाची राखी' या ब्रँडने याही वर्षी राबवला आहे. मात्र, 'मी शिंदे समर्थक आणि पुढच्या वर्षी देखील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत' असे जोरात बोलावे, अशी अट राखी विक्रेते विरागी गांगर यांनी ठेवली आहे. त्यांच्या या उपक्रमाला ठाण्याच्या नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र दिसत आहे. (Eknath Shinde Rakhi)
राखीला प्रचंड मागणी : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि समस्त ठाणेकरांमध्ये आनंदाची आणि उत्साहाची लाट पसरली. मुख्यमंत्र्यांनी सामान्य नागरिक, शेतकरी, महिला आणि कष्टकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्याने सर्वजण सुखावले आहेत. त्यातच ठाणेकर आणि एकनाथ शिंदे यांचे ऋणानुबंध अनेक दशकांपासून अत्यंत दृढ आहे. भाऊ बहिणीचे पवित्र नातं रक्षाबंधनाच्या निमित्ताने एका राखी बनविणाऱ्याने अभिनव कल्पना काढली असून, त्यांनी चक्क एकनाथ शिंदे यांचा फोटो असलेल्या राख्याच बाजारात आणल्या आहेत. ही राखी मोफत दिली जाते. परंतु घेणाऱ्याने ' मी एकनाथ शिंदे समर्थक आणि पुढच्या वर्षी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत' अशी घोषणा जोरात द्यावी अशी मागणी केली आहे. या राखीची प्रचंड मागणी महिलांमध्ये असल्याची माहिती विक्रेते विरागी गांगर यांनी दिली आहे.
महिलांसाठी राबवले अनेक उपक्रम : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी बरेच काम केले असली तरीही, आणखी कामे करावीत अशी मागणी महिलांनी केली. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्यासाठी देखील अनेक तरतुदी केल्याचे महिलांनी मान्य केले. त्यामुळे त्यांना आपण भाऊ म्हणून या राख्या पाठवणार असल्याचे महिला ग्राहकांनी सांगितलं.
मागील वर्षीही होती मोठी मागणी: मागील वर्षी मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर अवघ्या काही दिवसातच रक्षाबंधनाचा सण होता. या काळात विविध राख्यांप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटो असलेली राखी देखील उपलब्ध होती. त्या राखीला मिळालेल्या प्रतिसादानंतर या वेळेस या राखीची मोठ्या प्रमाणात निर्मिती घेण्यात आली आहे. ठाणेकरांना अभिमान असलेल्या मुख्यमंत्री पदामुळे ठाण्यातल्या अडचणी सुटू शकतील असा विश्वास, दुकानदार आणि ग्राहकांनी व्यक्त केला आहे.