ठाणे :रक्षाबंधनाचा (Rakshabandhan 2022) सण जवळ येतोय आणि राख्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक ठिकाणी कारखान्यांमध्ये बनणाऱ्या राख्यांपेक्षा हाताने बनणाऱ्या राख्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यामध्ये विशेष मुलांनी बनवलेल्या राख्यांना (Rakhi made by special children) तर, साता समुद्र पलीकडून मागणी (demand from across the sea) होत आहे .ठाण्यातील 'विश्वास सामाजिक संस्थेतील' विशेष मुलांकडून राख्या बनवल्या जातात आणि यांनी बनवलेल्या राख्यांना बाहेर देशातुन देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे .
ठाण्यातील 'विश्वास सामाजिक संस्थेत' विशेष मुलांना शिकवले जाते. मुख्य म्हणजे या संस्थेत १८ ते ५० वयोगटातील विशेष मुले आहेत. या मुलांना राखी, कंदील पणती बनवण्याचे धडे दिले जातात. प्रत्येक सणाला या मुलांनी तयार केलेल्या वस्तुंना मोठ्या प्रमाणात मागणी असते. राखी सुध्दा ही मुले एकाग्र चित्ताने बनवतात. त्यांच्या हातातील सातत्य आणि डोळ्यातील एकाग्रपणा वाढावा, यासाठी अश्या प्रकारचे कौशल्ये त्यांना शिकविली जातात. या संस्थेतील हितचिंतक या राख्या परदेशात पाठवतात. या राख्यांची विक्री प्रत्यक्ष संस्थेमार्फत केली जाते. तसेच ठाण्यात अनेक ठिकाणी स्टॉल देखील लावल्या जाते, असे संस्थेतील शिक्षकांनी सांगितले. या मुलांना या राख्यांच्या माध्यमातून आर्थिक मोबदला दिला जातो. त्यामुळे त्यांना याचा वेगळाच आनंद अनुभवता येतो, असे देखील शिक्षकांचे म्हणने आहे. तर राखी बनवत असताना आम्हाला आनंद मिळतो आमचे लक्ष एकाग्र होते. आम्हाला राखी बनवतांना शिक्षक मदत करतात, असे येथील विशेष मुलांचे म्हणणे आहे .