ठाणे - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या गड किल्ले भाड्याने देण्याच्या धोरणावर राज्यभरातून टीका होत आहे. आज डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सरकारच्या भूमिकेवर सडकून टीका केली. सरकारला उत्पन्न मिळवायचे असेल तर त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावे, असे राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा-मुंबईत मोदींच्या हस्ते तीन मेट्रो मार्गिकांचे भूमिपूजन; औरंगाबादलाही जाणार
त्यांनी सरकारचा हा निर्णय केवळ मूर्खपणाचा असल्याचे म्हणत सरकारचे वाभाडे काढले. ते म्हणाले की, महाराष्ट्राला भूगोल आणि इतिहास आहे. मात्र, सरकारला याचे काहीच देणे-घेणे नाही. जर सरकारला उत्पन्न हवे असेल, तर त्यांनी त्यांच्या मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावे, त्यातून त्यांनी पैसे मिळवावेत. भाजप मशीनच्या मदतीने निवडून येते. त्यामुळे ते लोकांना विचारात घेत नाही. राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकासाठी डोंबिवलीत आले होते. मात्र, बैठकीसाठी येताना वाहतूक कोंडीत अडकल्याने त्यांना याचा फटका बसला. त्यामुळे त्यांनी शनिवारची बैठक रद्द केली.