ठाणे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डोंबिवलीत निवडून देणारे हे कुठे आणि डॉ. हेगडेवार कुठे, अशी तुलना करीत आरएसएसच्या नथीतून राज ठाकरेंनी भाजपचे राजमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर डोंबिवलीच्या जाहीर सभेत टीकास्त्र सोडले.
कल्याण ग्रामीणसाठी प्रमोद तथा राजू पाटील आणि डोंबिवलीतून मंदार हळबे मतदारसंघात निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ध.ना. चौधरी मैदानात जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी भाजप- काँग्रेसचा सडकून समाचार घेतला.
हेही वाचा - ..तर देशभरातील लाखो यंत्रमाग कारखाने बंद पडतील- असदुद्दीन ओवैसी
डोंबिवलीची ओळख सुशिक्षितांची नगरी म्हणून केली जाते. सर्वात जास्त चार्टर्ड अकाऊंटंट डोंबिवलीतून बाहेर पडतात. मात्र, या डोंबिवलीची ओळख आज बकाल शहर म्हणून झाली आहे. त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात, असा आरोप राज ठाकरेंनी केला. ते म्हणाले, 12 मे 2019 रोजी राष्ट्रीय पातळीवरील कॅरमपटू जान्हवी मोरे हिचा खड्ड्यांनी बळी घेतला. अशा अनेकांचा या खड्डयांनीच बळी गेल्याचा ठाकरे यांनी पाढाच वाचून दाखवला. देवेंद्र फडणवीस यांनी याच डोंबिवलीत येऊन 6500 कोटी रुपयांची घोषणा केली. मात्र, एक छदामही दिला नाही. तो भाग वेगळाच, पण आपण ज्याला दोनदा निवडून दिले त्याला जाब विचारण्याची आपल्यात हिंमत का होत नाही? असाही सवाल ठाकरेंनी उपस्थितांशी बोलताना विचारला.
उत्तर भारतातून येणारे लोंढे यहा भी तो ऐसाही लागता है, असे बोलतात तेव्हा महाराष्ट्राची हिच ओळख आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. भारतात सर्वाधिक लोंढे केवळ ठाणे, कल्याण, भिवंडी, डोंबिवलीत येत असतात. असे सांगून बाहेरचे लोंढे थांबवा, असे आम्ही सतत ओरडत आलो. मात्र, आमच्या बोलण्याकडे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे याच लोंढ्यानी शहरे बकाल केली असा आरोप ठाकरेंनी यावेळी केला.